Maharashtra Election 2019: Shiv Sena fight in aurangabad; Challenge for Sattar | Maharashtra Election 2019 : बालेकिल्ल्यातच होतेय शिवसेनेची दमछाक; सत्तार यांच्यासाठी आव्हान
Maharashtra Election 2019 : बालेकिल्ल्यातच होतेय शिवसेनेची दमछाक; सत्तार यांच्यासाठी आव्हान

- विजय सरवदे

औरंगाबाद जिल्ह्यात यावेळी सर्व नऊ मतदारसंघांतील निवडणूक रंगतदार ठरणार आहे. सिल्लोड, फुलंब्री, गंगापूर, वैजापूर, औरंगाबाद पूर्व आणि औरंगाबाद मध्य मतदारसंघात सरळ लढत होईल, तर उर्वरित कन्नड, पैठण आणि औरंगाबाद पश्चिमध्ये तिरंगी- चौरंगी लढत होईल. वंचित बहुजन आघाडी तसेच ‘एमआयएम’ने काही ठिकाणी युती आणि आघाडीसमोर आव्हान उभे केले आहे.

या निवडणुकीत जिल्ह्यामध्ये काँग्रेसची दयनीय अवस्था आहे. फुलंब्री मतदारसंघ अपवाद सोडला, तर अन्य एकाही ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार रिंगणात नाही. पैठण, वैजापूर, कन्नड, सिल्लोड, औरंगाबाद पश्चिम व औरंगाबाद मध्य हे मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आले आहेत. या सर्वच ठिकाणी सेनेच्या उमेदवारांसमोर कुठे बंडखोरांचे, तर कुठे प्रतिस्पर्धी दिग्गज उमेदवारांनी आव्हान उभे केले आहे. पूर्व मतदारसंघात भाजपचे अतुल सावे यांच्यासमोर एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी उभे ठाकले आहेत. मध्य मतदारसंघात शिवसेनेच्या प्रदीप जैस्वाल यांच्यासमोर एमआयएमचे नासेर सिद्दीकी निवडणूक लढवत आहेत. ही जागा २०१४ मध्ये एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी जिंकली होती.

पश्चिम मतदारसंघामध्ये मात्र शिवसेनेच्या संजय शिरसाट यांच्यासमोर भाजपचे बंडखोर राजू शिंदे यांचे कडवे आव्हान आहे. सिल्लोड मतदारसंघात यापूर्वी काँग्रेसच्या तिकिटावर सलग दोन वेळा विजय मिळविलेल्या अब्दुल सत्तार यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना यावेळची निवडणूक सोपी राहिलेली नाही. पूर्वी सत्तार यांनी भाजपचे सातत्याने खच्चीकरण केले होते. त्यामुळे भाजपचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते ईरेला पेटले असून, ते सर्व जण अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांच्या मागे एकवटले आहेत.

कन्नड मतदारसंघात भाजपच्या दोन मंत्र्यांचे जावई हर्षवर्धन जाधव आणि व किशोर पवार हे समोरासमोर आहेत. राष्टÑवादीचे संतोष कोल्हे यांचेही आव्हान आहे. भाजपचे जि. प. सदस्य किशोर पवार यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने शिवसेनेचे उमेदवार उदयसिंग राजपूत यांच्यासह जाधव यांचीही डोकेदुखी वाढली आहे. वैजापूर मतदारसंघात राष्टÑवादी काँग्रेसचे अभय पाटील चिकटगावकर आणि शिवसेनेचे रमेश बोरनारे यांच्यात थेट लढत होईल.

प्रचारातील प्रमुख मुद्दे
१) आ. संदीपान भुमरे यांच्यावर सरकारी जमीन हडप केल्याचा आरोप.
२) ‘डीएमआयसी’मध्ये अद्याप उद्योग आले नाहीत, त्याबद्दलची नाराजी.
३) रस्त्यांची रखडलेली कामे, हा सर्वच मतदारसंघांत कळीचा मुद्दा राहील.
४) मध्य आणि पूर्व मतदारसंघात धार्मिक ध्रुवीकरणाच्या दृष्टीने प्रचार होणार.

रंगतदार लढती
अब्दुल सत्तार आणि प्रभाकर पालोदकर या दोघांमध्ये काट्याची लढत होणार आहे. सेना- भाजप युती असली, तरी भाजपचे तालुक्यातील सर्व दिग्गज हे प्रभाकर पालोदकरांना निवडून आणण्यासाठी परिश्रम घेत आहेत. सत्तार यांना ही निवडणूक अवघड जाणार आहे.
फुलंब्री मतदारसंघामध्ये विधानसभा अध्यक्ष तथा भाजपचे उमेदवार बागडे व काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांच्यात काट्याची टक्कर होईल. मागील निवडणुकीत बागडे हे मोदी लाटेमुळे थोड्या मतांनी विजयी झाले होते.
कन्नड मतदारसंघात भाजपच्या दोन दिग्गज मंत्र्यांचे जावई हर्षवर्धन जाधव व किशोर पवार हे निवडणुकीत आमने- सामने आहेत, तर शिवसेनेचे उदयसिंग राजपूत हेदेखील मैदानात आहेत. त्यामुळे या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

Web Title: Maharashtra Election 2019: Shiv Sena fight in aurangabad; Challenge for Sattar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.