शिंदेसेनेकडून ४२ जागांचा प्रस्ताव, जागा वाटपाचा तिढा सुटेना; तीन मंत्र्यांसह नेत्यांची जंबो बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 12:32 IST2025-12-26T12:31:14+5:302025-12-26T12:32:05+5:30
Amravati Municipal Election 2026: अमरावती महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिंदेसेना एकत्र येणार आहे. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षालाही भाजपा सोबत घेणार आहे.

शिंदेसेनेकडून ४२ जागांचा प्रस्ताव, जागा वाटपाचा तिढा सुटेना; तीन मंत्र्यांसह नेत्यांची जंबो बैठक
अमरावती महापालिका निवडणुकीत भाजप- शिंदेसेनेची युती होणार असून, नेत्यांच्या चर्चेच्या फेऱ्या सातत्याने होत आहे. मात्र, जागा वाटपासंदर्भात एकमत वजा अंतिम निर्णय होत नाही. त्यामुळे विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर व चंद्रपूर महापालिकेत युतीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी युतीतील वरिष्ठ नेत्यांची नागपूर येथे गुरुवारी बैठक पार पडली. यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योगमंत्री उदय सामंत, जलसंधारण मंत्री संजय राठोड, आ. संजय कुटे, माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यासह भाजप, शिंदेसेनेचे नेते उपस्थित होते.
अमरावती महापालिकेत शिंदेसेनेने ४२ जागांचा प्रस्ताव दिला आहे. तर, भाजपचा मित्र असलेल्या युवा स्वाभिमान पार्टीलाही जागा सोडाव्या लागणार आहे. अमरावती महापालिकेचे २२ प्रभागात ८७जागांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. तर भाजपने '५५ प्लस' हे लक्ष्य निर्धारित करून पुन्हा सत्ता स्थापनेसाठी रणनीती आखली आहे.
मतांचे विभाजन टाळण्यासाठी खटाटोप
हिंदू मतांचे विभाजन होणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतली जात आहे. त्याकरिता शिंदेसेना सोबत घेऊन अमरावती महापालिकेवर भगवा फडकविण्याचा निर्धार केला आहे. तर, भाजपकडे इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी असली तरी हिंदू मतांच्या विभाजनाचा फटका बसू नये, यासाठी शिंदेसेना, युवा स्वाभिमान पार्टी अशी युती करण्याची तयारी आहे.
शिंदेसेनेच्या नेत्यांनी जागेचा दिलेला प्रस्ताव बघता हा तिढा स्थानिक पातळीवर नेत्यांच्या आवाक्याबोहर जात असल्याने आता हा निर्णय युतीचे वरिष्ठ नेते घेणार आहे. अमरावती मनपात शिंदेसेनेला ७ तर युवा स्वाभिमानला १५ जागा देण्याची तयारी भाजप नेत्यांनी दर्शविल्याची विश्वसनीय माहिती आहे.
एबी फॉर्म थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडे; नुकसान?
भाजपने बंडखोरी टाळण्यासाठी शेवटच्या दिवशी म्हणजे ३० डिसेंबर रोजी निवडणूक अधिकाऱ्यांकडे भाजप उमेदवारांचे एबी फॉर्म देण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे इच्छुक भाजप उमेदवारांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
एका प्रभागात अमूक जागेसाठी चार उमेदवारांनी नामांकन अर्जात राजकीय पक्ष 'भाजप' असा उल्लेख केला असल्यास एबी फॉर्म हा एकाच्याच नावाचा असणार आहे. त्यामुळे आपसूकच अन्य तीन उमेदवारांचे अर्ज रद्द होऊन ते रिंगणा बाहेर होतील आणि निवडणूक लढविता येणार नाही, अशी माहिती आहे.
मालमत्ता, कर थकीत पाणीपट्टी असल्यास अर्ज होणार रद्द
महापालिका निवडणुकीत नामनिर्देशनपत्र सादर करताना उमेदवारांना मालमत्ता कर आणि पाणीपुरवठ्याचे देयके थकीत ठेवता येणार नाही, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यास संबंधित उमेदवारांचे नामांकन रद्द करण्याची तरतूद आहे. उमेदवारी अर्जासोबत कर भरल्याची पावती जोडावी लागणार आहे.