महापालिका निवडणूक: भाजपामुळे युती, पण शिंदेसेनेला युवा स्वाभिमानची ॲलर्जी? जागा वाटपाचा तिढा कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 12:41 IST2025-12-27T12:39:25+5:302025-12-27T12:41:53+5:30
अमरावती महापालिका निवडणूक २०२६: शिंदेसेनेने महायुतीत २५ जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

महापालिका निवडणूक: भाजपामुळे युती, पण शिंदेसेनेला युवा स्वाभिमानची ॲलर्जी? जागा वाटपाचा तिढा कायम
अमरावती : शिंदेसेनेने निवडणूक चिन्ह पोहोचविण्यासाठी प्रत्येक प्रभागात एक जागा, असा नवा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे येथील जागा वाटपाचे भिजत घोंगडे कायम आहे. शुक्रवारी भाजप, शिंदेसेनेच्या नेत्यांमध्ये चर्चेच्या फेरी झाल्या. शनिवार, २७ डिसेंबर रोजी जागा वाटपाबाबत एकमत होणार असून, त्यानंतर नेत्यांची पत्रपरिषद होणार आहे. शुक्रवारी येथील एका बड्या हॉटेलमध्ये बैठक घेण्यात आली.
शिंदेसेनेने महायुतीत २५ जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. मात्र, भाजपच्या कोअर कमिटीसमेवत झालेल्या चर्चेत अद्यापही तोडगा निघालेला नाही. यापूर्वी नागपुरात जागा वाटपावर बैठक झाली होती.
आता अमरावतीतही जागा वाटपसंदर्भात सलग चर्चेची मालिका सुरू असली तरी निर्णय पुढे ढकलला जात असल्याचे चित्र आहे.
जागा वाटपावरून युतीत मतभेद वाढत असल्याची राजकीय क्षेत्रात कुजबुज सुरू असून, युती फिस्कटण्याची शक्यता काही राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. तरीही अधिकृत पातळीवर कोणतीही घोषणा झालेली नाही.
शिंदेसेनेला युवा स्वाभिमानची ॲलर्जी?
माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी गत विधानसभा निवडणुकीचा दाखला देत 'युती धर्म' पाळण्यात आला नव्हता. परंतु यापुढे आमच्या उमेदवारांविरोधात उमेदवार उभे केले, तर प्रत्युत्तरात आम्ही उमेदवार देऊ.
हिंदुत्ववादी मतांचे विभाजन टाळणे हा हेतू होता. चुकीच्या पद्धतीने उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न झाला, तर युतीला काही अर्थ उरणार नाही. त्यामुळे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानला युतीत सामावून घेण्याच्या चर्चेमुळे तणाव वाढला असून, युती होते की नाही? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.