Lok Sabha Election 2019; रवि राणांविरुद्ध देवपारेंची पोलिसांत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 01:13 AM2019-04-11T01:13:08+5:302019-04-11T01:14:33+5:30

भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा आशीर्वाद असल्याचे वक्तव्य करणारे आ. रवि राणा यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार वंचित आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांच्या निवडणूक प्रतिनिधीने मंगळवारी गाडगेनगर पोलिसांत केली.

Lok Sabha Election 2019; Police complaint against Ravi Rana of Devaparne | Lok Sabha Election 2019; रवि राणांविरुद्ध देवपारेंची पोलिसांत तक्रार

Lok Sabha Election 2019; रवि राणांविरुद्ध देवपारेंची पोलिसांत तक्रार

Next
ठळक मुद्देआंबेडकरांच्या आशीर्वादाचा मुद्दा : प्रकरण सहायक निवडणूक अधिकाऱ्यांकडे चौकशीसाठी वर्ग

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा आशीर्वाद असल्याचे वक्तव्य करणारे आ. रवि राणा यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार वंचित आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांच्या निवडणूक प्रतिनिधीने मंगळवारी गाडगेनगर पोलिसांत केली. पोलिसांनी ती तक्रार निवडणूक विभागाच्या आचारसंहिता कक्षाकडे पाठविली. नोडल आॅफिसर तथा जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी ती तक्रार अमरावती विधानसभेचे सहायक निवडणूक अधिकारी यांच्याकडे चौकशीकरिता पाठविली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांचे निवडणूक प्रतिनिधी रवींद्र मुंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आ. रवि राणा व अपक्ष उमेदवार नवनीत राणा अमरावती लोकसभेतील मतदारांना संभ्रमित व विचलित करीत आहे. आमच्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन अपप्रचार करीत आहेत. ३ एप्रिल रोजी नवनीत राणा यांच्या शेगाव नाक्यावरील प्रचारसभेत त्यांनी प्रकाश आंबेडकर यांचा आशीर्वाद असल्याचे भाष्य केले होते. ८ एप्रिल रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनातील सभेतसुद्धा आ. रवि राणा यांनी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा नवनीत राणा यांना अदृश्य (छुपा) पाठिंबा असल्याचे सांगितले तसेच पाठिंबांसदर्भात आंबेडकर यांना दोन वेळा भेटलो, असे वक्तव्य आ. राणा यांनी केले. त्यांचे वक्तव्य हे वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले असून, सोशल मीडियावरही फिरत आहे. आ. राणांच्या या वक्तव्यामुळे मतदारांमध्ये व निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहे.
गुणवंत देवपारे हे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्यामुळे रवि राणांचे हे उद्गार धादांत खोटे व मतदारांची फसवणूक करणारे आहे. लोकप्रतिनिधी असलेले रवि राणा यांच्याकडून मतदारांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे आ. रवि राणा व अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार देवपारेंचे निवडणुक प्रतिनिधी रवींद्र मुंद्रे यांनी पोलिसांत केली आहे.

गाडगेनगर पोलिसांकडून तक्रार प्राप्त झाली. पुढील चौकशी व पडताळणीसाठी ती अमरावती विधानसभा सहायक निवडणूक अधिकारी यांच्याकडे पाठविली आहे. यासंदर्भात पुढील कार्यवाहीचा निर्णय ते देतील.
- संदीप जाधव, नोडल आॅफिसर, निवडणूक विभाग

तक्रार प्राप्त झालेली आहे. हा विषय निवडणूक विभागाशी संबंधित असल्याने ती तक्रार आचारसंहिता कक्षाकडे पाठविण्यात आली आहे. चौकशीअंती पुढील कारवाईची दिशा ठरेल.
- मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे

Web Title: Lok Sabha Election 2019; Police complaint against Ravi Rana of Devaparne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.