अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत, हजारो एकर शेती पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2022 13:00 IST2022-07-05T12:57:50+5:302022-07-05T13:00:38+5:30
चांदूर बाजार शहरासह तालुक्यातील हैदतपूर वडाळा, बेलोरा, तळवेल, वाटोंडा, चिंचोली सह संपूर्ण तालुक्यात पावसाने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत, हजारो एकर शेती पाण्याखाली
अमरावती : जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला असून नागरिकांची अक्षरश: ताराबंळ उडाल्याचे चित्र आहे. चांदूर बाजार शहरासह तालुक्यात जोरदार पावसामुळे रस्ते जलमय झाले, अनेक घरात पावसाचे पाणी घुसले असून साहित्याची नासाडी झाली आहे.
चांदूर बाजार शहरातील रामभट प्लॉट, मैनाबाई शाळा परिसर या भागातील जवळजवळ ३०० ते ४०० नागरिकांच्या घरात पाणी शिरले. यासोबतच तालुक्यातील हैदतपूर वडाळा, बेलोरा, तळवेल, वाटोंडा, चिंचोली सह संपूर्ण तालुक्यात पावसाने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतातील बांध फुटून हजारो एकर शेती पावसाच्या पाण्यामुळे जलमग्न झाली आहे. पावसाळ्याचे दिवस असतानाही ग्राम पंचायतीकडून तुंबलेल्या नाल्यांची वेळेवर साफसफाई न केल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे ग्रामस्थ म्हणाले.
दरम्यान, वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार छत्तीसगडमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने नागपूरसह लगतच्या जिल्ह्याच्या आसमंतात ढग दाटले आहेत. नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यात रविवारच्या रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली. तर, येत्या ८ जुलैपर्यंत हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याने पुढील ३-४ दिवस पावसाचे राहणार आहेत.