अमरावतीत अखेर भाजप-शिंदेसेनेची युती ठरली; नाराजी कायम, अधिकृत सांगणार कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:26 IST2025-12-30T13:22:02+5:302025-12-30T13:26:38+5:30
Amravati : भाजप ४९, शिंदेसेना १७, युवा स्वाभिमान ९ असे जागावाटपाचे सूत्र; महापरिश्रमानंतर शिक्कामोर्तब

BJP-Shinde Sena alliance finally formed in Amravati; Discontent remains, who will say officially?
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गत आठ दिवसांपासून भाजप आणि शिंदेसेनेत युती व्हावी, यासाठी दोन्ही बाजूच्या नेत्यांमध्ये वाटाघाटी, बैठकी आणि चर्चाच्या फैरीनंतर सोमवारी युतीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. जागा वाटपाबाबत फॉर्म्युला ठरला आहे. सूत्रांनुसार, भाजप ४९, शिंदेसेना १७ तर युवा स्वाभिमान ९ जागांवर निवडणूक लढणार आहे. मात्र, शिंदेसेनेचे नेते माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनी बैठकीतून 'वॉकआऊट' केल्याने शिंदेसेनेत आलबेल नाही, असे दिसून आले.
शहरातील एका बड्या हॉटेलमध्ये युतीसंदर्भात सोमवारी भाजप आणि शिंदेसेनेच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र, निर्णय होत नसल्याने दुपारी २.३० वाजताच्या सुमारास शिंदेसेनेचे नेते तथा जलसंधारण मंत्री यांनी युतीच्या बोलणीसाठी गोडे वैद्यकीय महाविद्यालय गाठले. या ठिकाणी भाजप आमदार संजय कुटे, माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील, शिवराय कुळकर्णी, जयंत डेहनकर, डॉ. नितीन धांडे, दिनेश सूर्यवंशी आणि शिंदेसेनेचे माजी आमदार संजय रायमुलकर, माजी आमदार अभिजित अडसूळ, श्याम देशमुख, आशिष धर्माळे आदी उपस्थित होते. कोण किती जागांवर निवडणूक लढणार, याविषयी अंतिम बोलणी झाली नि युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
युती न झाल्यास दोघांचेही नुकसान: अभिजित अडसूळ
भाजपा-शिंदेसेनेची युतीसंदर्भात बैठक संपली. जागा वाटपाबाबत अद्यापही निर्णय झाला नाही. भाजपकडे २५ जागांची मागणी केली. युती व्हावी ही इच्छाच आहे. युती न झाल्यास दोघांचेही नुकसान होऊ शकते. त्यामुळे युती हवीच. जागा वाटपाबाबत भाजपासोबत आमची चर्चा सुरूच आहे, लवकरच निर्णय होईल, असे शिंदेसेनेचे माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी सांगितले.
ना. संजय राठोड यांनी पुन्हा अमरावती गाठले
गोडे महाविद्यालयात युतीसंदर्भात बोलणी आणि अंतिम निर्णय झाल्यानंतर शिंदेसेनेचे नेते ना. संजय राठोड, माजी आमदार संजय रायमुलकर यांनी अमरावती गाठले. त्यानंतर एका बड्या हॉटेलमध्ये शिंदेसेनेच्या स्थानिक नेत्यांसमवेत युतीविषयी सोमवारी सांयकाळी ६.३० वाजताच्या सुमारास बैठक घेतली. या बैठकीत माजी मंत्री जगदीश गुप्ता, माजी आमदार अभिजित अडसूळ व ज्ञानेश्वर धाने पाटील, प्रीती बंड, श्याम देशमुख, आशिष धर्माळे उपस्थित होते. या बैठकीतूनमाजी मंत्री जगदिश हे अर्ध्या तासातच बाहेर पडले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड नाराजी झळकत होती. बैठकीत काय झाले असे गुप्ता यांना विचारताच त्यांनी 'जय श्रीराम' म्हणत प्रसार माध्यमांशनी बोलणे टाळले, हे विशेष.
जगदीश गुप्ता आज भूमिका जाहीर करणार
अमरावती महापालिका निवडणुकीत केवळ १७ जागा मिळाल्याबद्दल नाराज होऊन माजी मंत्री जगदीश गुप्ता सोमवारी बैठकीतून बाहेर पडल्याची माहिती आहे. दरम्यान प्रसार माध्यमांनी विचारले असता 'जय श्रीराम' असे म्हणत त्यांनी मंगळवार, ३० डिसेंबर रोजी अधिकृत आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले. जगदीश गुप्ता पत्रकार परिषद घेत धक्कातंत्राचा वापर करण्याची असल्याची शक्यता आहे. भाजप शिंदेसेनेला सन्मानजनक जागा देत नसल्याचा जगदीश गुप्ता यांचा आरोप आहे.