शक्य असतानाही युती का टाळली? शिंदेसेनेत चर्चा; स्थानिक नेत्यांच्या भूमिकेवरच शंका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 13:56 IST2026-01-04T13:55:41+5:302026-01-04T13:56:22+5:30
Akola Municipal Elections 2026: स्वबळाच्या निर्णयामुळे शिंदेसेना नेतृत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह! तत्कालीन शिवसेनेचे केवळ आठ नगरसेवक विजयी: शिवसेना फुटल्यानंतर परिस्थितीमध्ये मोठा बदल!

शक्य असतानाही युती का टाळली? शिंदेसेनेत चर्चा; स्थानिक नेत्यांच्या भूमिकेवरच शंका
Akola Municipal राज्यातील चार महापालिकांमध्ये भाजप-शिंदेसेना युती झाली असताना, अकोल्यात मात्र युती होण्याची संधी असूनही ती का साधली गेली नाही, यावर शिंदेसेनेच्या गोटातच जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपसोबतची नैसर्गिक युती बाजूला ठेवत, शिंदेसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दरम्यान, स्वबळावर लढण्याच्या शिंदेसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या अट्टहासामुळेच युतीचा प्रस्ताव अखेर फिसकटल्याची चर्चा आहे. युती झाली असती, तर शिंदेसेनेला महापालिकेत सन्मानजनक यश मिळण्याची संधी होती; मात्र स्वबळावर लढण्याचा निर्णय पक्षाला राजकीयदृष्ट्या महागात पडू शकतो, असा सूर राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त होत आहे.
स्वबळाच्या निर्णयामुळे शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यामध्येही संभ्रमाचे वातावरण असून, भाजपसोबत युती न करण्यामागचे नेमके कारण काय, याबाबत स्पष्टता नसल्याचे चित्र आहे. परिणामी, अकोला महापालिका निवडणुकीत शिंदेसेनेच्या स्वबळाच्या भूमिकेचा पक्षाला नेमका किती फटका बसेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
युती न झाल्याने शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संभाव्य उमेदवारांना घरी बोलावून थेट एबी फॉर्म दिल्याची चर्चा शहरात सुरू आहे; मात्र या घाईघाईच्या व गोंधळलेल्या तयारीमुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, शिंदेसेनेचा नेमका उमेदवार कोण, असा प्रश्न खुलेआम विचारला जात आहे.
पदाधिकाऱ्यांचा हट्ट
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत भाजपसोबत युतीबाबत चर्चा सुरू होती. यासाठी शिंदेसेनेचे नेते व जलसंधारणमंत्री संजय राठोड यांनी स्वतः अकोल्यात येऊन रात्री उशिरापर्यंत बैठका घेतल्या; मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या स्वबळावर लढण्याच्या हट्टापुढे अखेर राज्य नेतृत्वालाही माघार घ्यावी लागल्याचे बोलले जात आहे.
मागील महापालिका निवडणुकीत एकत्रित शिवसेनेचे आठ नगरसेवक निवडून आले होते. बदललेल्या राजकीय समीकरणात, भाजपसोबत युती झाली असती, तर ही संख्या वाढवण्याची संधी शिंदेसेनेला उपलब्ध होती, असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला युतीत १४ जागा वाट्याला आल्या असताना, भाजपचा नैसर्गिक मित्र असलेल्या शिंदेसेनेलाही सन्मानजनक वाटा मिळू शकला असता, असेही बोलले जात आहे.
निकालानंतरच पुढे येतील परिणाम
स्थानिक नेत्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे ही संधी धुडकावल्याची टीका आता पक्षातच दबक्या आवाजात सुरू झाली आहे. पक्षाची ताकद वाढवायची की, केवळ स्वतःचे वर्चस्व टिकवायचे, असा थेट सवाल उपस्थित केला जात असून, मनातच युती नसेल तर चर्चा कितीही झाली तरी निर्णय कसा होणार, असा प्रश्नही विचारला जात आहे.
एकूणच, अकोला महापालिका निवडणुकीत शिंदेसेनेने भाजपसोबत युती न करण्याच्या निर्णयामागील खरे 'गणित' काय आणि स्थानिक नेतृत्वाने नेमका कोणता डाव खेळला, हे कदाचित निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.