Municipal Election 2026: कोण कायम, कोणाची माघार? महापालिका निवडणुकीचे चित्र आज सुस्पष्ट होणार!
By नितिन गव्हाळे | Updated: January 2, 2026 13:25 IST2026-01-02T13:23:15+5:302026-01-02T13:25:12+5:30
Akola Municipal Election 2026: काही प्रभागांत अवघ्या आठ-दहा दिवसांपूर्वी पक्षात आलेल्या चेहऱ्यांना उमेदवारी दिल्याने नाराज होऊन काहींनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे.

Municipal Election 2026: कोण कायम, कोणाची माघार? महापालिका निवडणुकीचे चित्र आज सुस्पष्ट होणार!
- नितीन गव्हाळे, अकोला
अकोला महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षच नव्हे, तर काँग्रेस आणि शिंदेसेनेतही तिकीट वाटपामुळे नाराजीचा सूर तीव्र झाला आहे. अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी व इच्छुकांना डच्चू देण्यात आल्याने असंतोष उघडपणे समोर आला आहे. विशेष म्हणजे, काही प्रभागांत अवघ्या आठ-दहा दिवसांपूर्वी पक्षात आलेल्या चेहऱ्यांना उमेदवारी दिल्याने नाराज होऊन काहींनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. आता 'बंडोबा' उमेदवारी मागे घेतात, की कायम ठेवतात, हे चित्र आज (२ जानेवारी) सायंकाळी स्पष्ट होणार आहे.
भाजपने माजी महापौर सुमनताई गावंडे यांना प्रभाग क्रमांक २० मधून उमेदवारी नाकारल्यानंतर, त्यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली आहे. भाजपचे माजी नगरसेवक गोपी ठाकरे आणि आशिष पवित्रकार हेदेखील अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत.
भाजपकडून बरीच वर्षे नगरसेवक राहिलेले विजय इंगळे, तसेच भाजपच्या माजी नगरसेविका सारिका जयस्वाल यांनाही तिकीट न मिळाल्याने त्या यांनाही तिकीट न मिळाल्याने त्या दोघांनीही उद्धवसेनेची वाट धरली आहे. काँग्रेसमध्येही वेगळे चित्र नाही. माजी महापौर सुरेश पाटील यांना कॉग्रेसने प्रभाग क्रमांक ६ मधून तिकीट नाकारल्याने, त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.
शिंदेसेनेचे रिंगणात सर्वाधिक उमेदवार !
एकसंध शिवसेनेने गेल्या निवडणुकीत स्वबळावर ८ जागा जिंकल्या होत्या. यंदा भाजपसोबत युती न होऊ शकल्याने शिंदेसेनेने स्वबळावर ७४ उमेदवार उभे करून भाजपला थेट आव्हान दिले आहे.
एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेल्या वेळी पाच जागांवर विजय मिळाला होता. यावेळी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष भाजपसोबत युती करून १४ जागा लढवत आहे, तर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष काँग्रेससोबत आघाडी करून २५ जागांवर लढत देणार आहे.
आज कोणाची माघार, कोण कायम राहणार?
तिकीट वाटपाने राजकारण ढवळून निघाले असून, बंडखोरी, पक्षांतर आणि अपक्षांची गर्दी, हीच निवडणुकीची ओळख ठरण्याची चिन्हे आहेत. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशीच्या चित्राकडे आता लक्ष लागले आहे.