२७ जागांवर वंचित कुणाचा करणार 'गेम', महापालिका निवडणुकीत ५३ उमेदवार उतरवले रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 18:54 IST2026-01-01T18:53:05+5:302026-01-01T18:54:32+5:30
अकोला महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांचे जुळले नाही. वंचित बहुजन आघाडीने ५३ ठिकाणी आपले उमेदवार दिले, असले तरी २७ जागांवर वंचितचा पाठिंबा निर्णायक ठरणार आहे.

२७ जागांवर वंचित कुणाचा करणार 'गेम', महापालिका निवडणुकीत ५३ उमेदवार उतरवले रिंगणात
अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने विविध प्रभागांत ५३ उमेदवार जाहीर करण्यात आले असले तरी, चार प्रभागांसह २७ जागांवर पक्षाचे उमेदवारच नसल्याच्या परिस्थितीत संबंधित ठिकाणी वंचित बहुजन आघाडी काय भूमिका घेणार, याकडे आता लक्ष लागले आहे. अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने केलेल्या विविध प्रभागांतील ५३ उमेदवारांना पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये अकोला शहराच्या पश्चिम भागातील ३२ व पूर्व भागातील २१ जागांचा समावेश आहे;
प्रभागांत उमेदवार नाहीत!
शहरातील चार प्रभागांसह २७जागांवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नाहीत. या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर व निवडणूक चिन्ह वाटपाची प्रक्रिया आटोपल्यावर उमेदवार नसलेल्या संबंधित प्रभागांतील जागांच्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
'वंचित बहुजन आघाडी'चे उमेदवार नसलेले असे आहेत प्रभाग व जागा!
प्रभागत क्र. ६, ११, १५ व २० या चार प्रभागांत प्रत्येकी ४ जागा तसेच प्रभाग क्र. १ मधील १, प्रभाग क्र. ५ मधील २, प्रभाग क्र. १० मधील ३, प्रभाग क्र. १२ मधील १, प्रभाग क्र. १६ मधील १, प्रभाग क्र. १७मधील २ आणि प्रभाग क्र. १९ मधील १ जागेवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नसल्याचे चित्र आहे. त्याअनुषंगाने पक्षाचे अधिकृत 3 उमेदवार नसलेल्या संबंधित ठिकाणी वंचित बहुजन आघाडी काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.