वंचित, एमआयएमने काँग्रेसची वाट केली 'बिकट'! महापालिका निवडणुकीत आमदाराचा लागणार 'कस'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:46 IST2026-01-02T13:43:30+5:302026-01-02T13:46:13+5:30

Akola Municipal Election 2026: अकोला महापालिकेची निवडणुकी काँग्रेससाठी जड जाताना दिसत आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी न झाल्याने आंबेडकरांचा पक्ष स्वबळावर उतरला आहे. तर दुसरीकडे एमआयएममुळे मतविभाजनाची चिंताही वाढली आहे.

The Congress's victory in the Akola Municipal Corporation elections has become difficult due to the Vanchit Bahujan Aghadi and the AIMIM party | वंचित, एमआयएमने काँग्रेसची वाट केली 'बिकट'! महापालिका निवडणुकीत आमदाराचा लागणार 'कस'

वंचित, एमआयएमने काँग्रेसची वाट केली 'बिकट'! महापालिका निवडणुकीत आमदाराचा लागणार 'कस'

-सदानंद सिरसाट, अकोला
अकोला शहरासह जिल्ह्यात अस्तित्व टिकविण्यासाठी गत अनेक वर्षापासून झगडत असलेल्या काँग्रेसला अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील विजयामुळे थोडे बळ मिळाले असताना, महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत न होऊ शकलेली युती आणि नगरपालिका निवडणुकांतील यशामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या असदुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाने तब्बल ३८ मजलीस-ए-इत्तेहादूल उमेदवार रिंगणात उतरवल्याने कॉग्रेसची वाट बिकट झाल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये सात नगरसेवक आणि अकोटात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाल्याने एमआयएम पक्षाचा आत्मविश्वास दुणावला असून, पक्षाने अकोला महापालिका निवडणुकीत उत्साहाने उडी घेतली आहे. 

काँग्रेसचा पारंपरिक मतदार एमआयएमकडे आकृष्ट होत असल्याने, आता एमआयएमची घोडदौड रोखणार कशी, या चिंतेने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना ग्रासल आहे. त्यांच्या चिंतेत भर घालत, वंचित बहुजन आघाडीही स्वबळावर रिंगणात आहे. त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांना बोचऱ्या थंडीतही घाम फुटू लागला आहे.

नगरपरिषदांच्या निवडणुकांत एमआयएमने डोळ्यात भरेल, असे यश मिळवले. अकोटमध्ये एमआयएमचे ५, तर काँग्रेसचे ६ नगरसेवक विजयी झाले. तर बार्शिटाकळी, हिवरखेडमध्येही प्रत्येकी एक नगरसेवक आहे.

आमदारावर जबाबदारी

काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी संबंधित आमदारांवर सोपवली आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिका निवडणुकीत अकोला पश्चिमचे आमदार साजिदखान पठाण यांची कामगिरी कशी होते, यावरच त्यांचे पक्षातील वजन ठरणार आहे.

'वंचित'चाही फरक पडणार

वंचित बहुजन आघाडीचे नगरपरिषद निवडणुकांमध्ये एक नगराध्यक्ष आणि १७नगरसेवक विजयी झाले आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे २० नगरसेवक निवडून आले आहेत. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला समविचारी मानले जाते आणि उभय पक्षांची मतपेढी समान आहे.

एमआयएमचा मतपेढीवर निशाणा

एमआयएमने काँग्रेसची पारंपरिक मतपेढी असलेल्या आठही प्रभागांत ३२ उमेदवार दिले आहेत. प्रभाग क्रमांक १,२,७,८,९,११,१७,१८ मध्ये एमआयएम आणि काँग्रेसने चारही जागांवर उमेदवार दिले आहेत. 

एमआयएमने प्रभाग क्रमांक १४ व १६ मध्ये अनुक्रमे तीन आणि दोन उमेदवार दिले आहेत. प्रभाग १४ मध्ये काँग्रेसचे २ व एमआयएमचे ३, तर प्रभाग १६ मध्ये दोन्ही पक्षांचे अनुक्रमे १ व २ उमेदवार रिंगणात आहेत. त्यावरून एमआयएमने काँग्रेसच्या पारंपरिक मतपेढीला लक्ष्य केल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

नगरपालिका निवडणुकांच्या पुनरावृत्तीची धास्ती !

अकोटात नगराध्यक्ष पदाच्या लढतीत एमआयएमच्या उमेदवाराने दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली. त्यामुळे काँग्रेसच्या पारंपरिक मतपेढीत एमआयएमने चांगलाच खड्डा पडल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत झाले आहे. आता महापालिका निवडणुकीतही नगरपालिका निवडणुकांची पुनरावृत्ती होते की काय, अशी धास्ती काँग्रेस पदाधिकाऱ्यांना वाटू लागली आहे.

Web Title: The Congress's victory in the Akola Municipal Corporation elections has become difficult due to the Vanchit Bahujan Aghadi and the AIMIM party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.