शिंदेसेनेचे स्वबळावर ७४ उमेदवार! महायुतीचे जागावाटप बारगळले; निवडणूक होणार चुरशीची
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 16:59 IST2025-12-31T16:57:23+5:302025-12-31T16:59:15+5:30
अकोला महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने शिंदेसेनेला सोबत घेण्याचा प्रयत्न केला, पण जागावाटपाचे सूत्र जुळलेच नाही. त्यामुळे शिंदेसेना स्वबळावर रिंगणात उतरली आहे.

शिंदेसेनेचे स्वबळावर ७४ उमेदवार! महायुतीचे जागावाटप बारगळले; निवडणूक होणार चुरशीची
अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीतील घटक पक्षांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली जागावाटपाची चर्चा अखेर निष्फळ ठरल्यानंतर शिंदेसेनेने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ७४ उमेदवार रिंगणात उतरवले. त्यामुळे निवडणूक चुरशीची ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अकोला महापालिकेतील भाजप-शिंदेसेना युतीबाबत तोडगा काढण्यासाठी शिंदेसेनेचे नेते व राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सोमवारी अकोल्यात बैठक घेतली होती.
या बैठकीत युतीसंदर्भात सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, जागावाटपाबाबत समाधानकारक चर्चा न झाल्याने आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची नाराजी लक्षात घेता, शिंदेसेनेने अखेर स्वबळावर निवडणूक लढवण्याचा स्पष्ट नारा दिला. या निर्णयामुळे अनेक इच्छुकांना उमेदवारी मिळाली असून, शहरातील बहुतांश प्रभागांत शिंदेसेनेचे उमेदवार थेट मैदानात उतरले आहेत.
माजी नगरसेवकांना संधी
पक्षाने यावेळी माजी नगरसेवकांना प्राधान्य देत राजेश मिश्रा, उषा विरक, सपना नवले आणि सारिका जयस्वाल यांना उमेदवारी दिली आहे. राजेश मिश्रा यांच्या पत्नीऐवजी त्यांच्या काकू गीता रमाशंकर मिश्रा यांना तिकीट देण्यात आले आहे. तसेच माजी नगरसेवक गजानन चव्हाण यांच्या पत्नी सविता चव्हाण यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.
जवळपास ३६ महिला उमेदवार रिंगणात
शिंदेसेनेने स्वबळावर ७४ उमेदवार उभे करताना काही ठिकाणी अनुभवी माजी नगरसेविकांना पुन्हा संधी देण्यात आली आहे, तर अनेक नव्या महिला चेहऱ्यांनाही राजकारणात प्रवेशाची संधी मिळाली आहे. महिला उमेदवारांची संख्या ३६ आहे.
महापालिका निवडणुकीत शिंदेसेनेने स्वबळावर ७४ उमेदवार रिंगणात उतरविले असून, त्यामध्ये महिलांना ने उमेदवारी देत विशेष प्राधान्य दिले आहे, असे शिंदेसेनेचे उपनेते गोपीकिशन बाजोरिया यांनी सांगितले.