महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 11:57 IST2025-12-25T11:55:08+5:302025-12-25T11:57:33+5:30
Akola Municipal Election: काँग्रेसकडून प्रतिसाद न आल्याने वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी स्थानिक काँग्रेसकडून युतीचा कोणताही प्रस्ताव अद्याप प्राप्त झाला नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, त्यामध्ये पक्षाच्या पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येत असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक माजी आमदार अॅड. नातीकोद्दीन खतीब यांनी बुधवारी (२४ डिसेंबर) दिली.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांच्या 'यशवंत भवन' या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप वगळता इतर समविचारी पक्षांसोबत युती करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची तयारी असून, अकोला महानगरपालिका निवडणुकीत मात्र काँग्रेसच्या स्थानिक आणि प्रदेशस्तरावरून युतीसाठी अद्याप कोणताही प्रस्ताव आला नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून सर्व प्रभागांत उमेदवार निश्चितीची प्रक्रिया २४ डिसेंबरपासून सुरू करण्यात आली आहे.
दोन प्रभागांतील पाच उमेदवार जाहीर !
महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन प्रभागांतील पाच उमेदवारांची पहिली यादी वंचित बहुजन आघाडीकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रभाग क्र.७ मधून किरण डोंगरे, महेंद्र डोंगरे आणि प्रभाग क्र.९ मधून चंदू शिरसाट, नाज परवीन शेख वसीम, शमीम परवीन कलीमखान पठाण या पाच उमेदवारांचा समावेश असल्याची माहिती अॅड. खतीब यांनी दिली.
प्रभाग क्रमांक ७ अ - किरण डोंगरे
प्रभाग क्रमांक ७ ड - महेंद्र डोंगरे
प्रभाग क्रमांक ९ अ - चंदू शिरसाट
प्रभाग क्रमांक ९ ब - नाज परवीन शेख वसीम
प्रभाग क्रमांक ९ क - शामिम परवीन कलीम खान पठाण
बाळासाहेबांच्या उपस्थितीत काँग्रेसचा प्रस्ताव नाही !
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर गेल्या दोन दिवसांत अकोल्यात होते. तरीही स्थानिक काँग्रेसकडून युतीसाठी वंचित बहुजन आघाडीकडे युतीचा प्रस्ताव ठेवण्यात आला नाही.
समविचारी पक्षाचा प्रस्ताव आल्यास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. आंबेडकर यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचेही खतीब यांनी स्पष्ट केले.