भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा; महापौर, उपमहापौरांची नावेही निश्चित; ४४ नगरसेवकांची पडताळणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 21:19 IST2026-01-28T21:18:24+5:302026-01-28T21:19:36+5:30
महापालिकेत सत्तास्थापनेचा भारतीय जनता पक्षाचा मार्ग मोकळा झाला आहे, तर विरोधकांच्या सत्तास्थापनेच्या प्रयत्नांना ब्रेक लागला आहे.

भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा; महापौर, उपमहापौरांची नावेही निश्चित; ४४ नगरसेवकांची पडताळणी
अकोला महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी स्थापित शहर सुधार आघाडीत समावेश असलेल्या विविध पक्षांच्या ४४ नगरसेवकांची पडताळणी मंगळवारी विभागीय आयुक्तांकडे पूर्ण झाली. त्यामुळे महापालिकेत सत्तास्थापनेचा भारतीय जनता पक्षाचा मार्ग मोकळा झाला आहे, तर विरोधकांच्या सत्तास्थापनेच्या प्रयत्नांना ब्रेक लागला आहे. शुक्रवारी महापालिकेत आयोजित विशेष सभेत महापौर, उपमहापौर निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे.
भाजपच्या नेतृत्त्वाखालील शहर सुधार आघाडीत भाजपच्या ३८, राष्ट्रवादी (शरद पवार) च्या तीन आणि शिंदेसेना, राष्ट्रवादी (अजित पवार) व महानगर विकास समितीच्या प्रत्येकी एका नगरसेवकाचा समावेश आहे. विरोधकांचे भाजप वगळता इतर सर्व पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू होते.
४४ दुसरीकडे आमदार रणधीर सावरकर यांनी रणनीती आखत, परिस्थिती आपल्या बाजूने वळवून नगरसेवकांची 'शहर सुधार आघाडी' स्थापन केली. त्या नगरसेवकांची विभागीय आयुक्तांकडे मंगळवारी पडताळणीही झाली. भाजपने महापौर व उपमहापौरांची नावेही निश्चित केली आहेत.
महापौर खेडकर, उपमहापौर गोगे?
विभागीय आयुक्तांकडे ४४ नगरसेवकांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर महापौर पदासाठी प्रभाग क्रमांक १५च्या नगरसेविका शारदा खेडकर यांचा भाजपच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आला आहे; तर उपमहापौरपदासाठी प्रभाग १८ चे नगरसेवक अमोल गोगे यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे.
इच्छुकांचा हिरमोड
भाजपने खेडकर यांच्यासोबत आणखी दोन नगरसेविकांना महापौरपदाचा अर्ज घेण्यास सांगितले होते. यामध्ये प्रबळ दावेदार म्हणून वैशाली शेळके यांचे नाव होते. परंतु, ऐनवेळी त्यांचा अर्ज दाखल न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.