Akola Lok Sabha Election 2019 live result & winner: Sanjay Dhotre win forth time | अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019 : संजय धोत्रेंचा विजयी चौकार
अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019 : संजय धोत्रेंचा विजयी चौकार

ठळक मुद्देप्रतिस्पर्धी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यापेक्षा २ लाख ७४ हजार ६५७ मतांची आघाडी घेत विजय मिळविला आहे. धोत्रे यांनी तब्बल ५ लाख ५४ हजार ४४४ इतकी मते मिळविली, तर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर गतवेळपेक्षा अधिक मते घेत दुसऱ्या क्रमांकावर राहिले.धोत्रे यांनी आतापर्यंतच्या लढतीमधील सर्वाधिक मतांचा विक्रम नोंदविला आहे.

- राजेश शेगोकार 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात सलग चौथा विजय मिळवून संजय धोत्रे यांनी मतदारसंघाच्या इतिहासात विक्रम नोंदविला आहे. या मतदारसंघात १९८९, १९९१ आणि १९९६ मध्ये भाजपाचे स्व. पांडुरंग फुंडकर सतत तीनदा या मतदारसंघात विजयी झाले होते. तो विक्रम मोडीत काढत धोत्रे यांनी नव्या विक्रमाची नोंद केली आहे. धोत्रे यांनी आपले प्रतिस्पर्धी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यापेक्षा २ लाख ७४ हजार ६५७ मतांची आघाडी घेत विजय मिळविला आहे. गतवेळच्या मताधिक्यापेक्षा यावेळी अधिक मताधिक्य घेत अकोल्यात ‘जय धोत्रेंचाच’ हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
अकोला : संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात अकोल्यात भाजपाने आपली पाळेमुळे घट्ट केली असून, भाजपाच्या या शक्तीला आव्हान देण्याची ताकद काँग्रेस तसेच वंचित बहुजन आघाडी या दोन्ही विरोधकांकडे नसल्याचे लोकसभा निवडणुकीच्या निकालाने स्पष्ट केले आहे. सलग तीन वेळा खासदार असल्यामुळे धोत्रे यांच्याविरोधात नकारात्मक लाट आहे, असे वातावरण तयार करण्यात आले होते, तसेच त्यांची उमेदवारीही धोक्यात असल्याच्या वावड्या उठविण्यात आल्या; मात्र सर्व विरोधकांच्या मनसुब्यांना नेस्तनाबूद करीत धोत्रे यांनी केवळ विजयच मिळविला नाही, तर मताधिक्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघात १८ लाख ६१ हजार ७३९ मतदार असून, त्यापैकी ११ लाख १६ हजार ७६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. २०१४ च्या तुलनेत यावेळी पार पडलेल्या निवडणुकीत मतदानात दोन टक्क्यांनी वाढ झाली होती. यामध्ये १ लाख ४४ हजार ४७८ नवीन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या मतदारांना आकर्षित करण्यात विरोधक अपयशी ठरले. धोत्रे यांनी तब्बल ५ लाख ५४ हजार ४४४ इतकी मते मिळविली, तर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर गतवेळपेक्षा अधिक मते घेत दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना २ लाख ७८ हजार ८४८ इतकी मते मिळाली. काँग्रेसच्या पटेल यांच्या पारड्यात २ लाख ५४ हजार ३७0 इतके मतदान पडले. धोत्रे यांनी आतापर्यंतच्या लढतीमधील सर्वाधिक मतांचा विक्रम नोंदविला आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत काँग्रेसच्या आघाडीचे समीकरण अखेरच्या क्षणापर्यंत जुळले नाही. त्यामुळे काँग्रेसने ऐनवेळी मुस्लीम मतांवर भिस्त ठेवत हिदायत पटेल यांना रिंगणात उतरविले. पटेल यांच्या उमेदवारीमुळे मुस्लीम मतांमध्ये विभाजन घडवून आणण्याची वंचितची खेळी बिघडली. अ‍ॅड. आंबेडकर यांनी ओबीसींचा जागर करीत आपले मताधिक्य वाढविण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला; मात्र काँग्रेस किंवा वंचित या दोन्ही पक्षांचे उमेदवार धोत्रेंना मिळालेल्या मतांपर्यंतही पोहोचू शकले नाहीत. या विजयामुळे अकोल्यात संजय धोत्रे यांना पर्याय नसल्याचे अधोरेखित झाले आहे.


Web Title: Akola Lok Sabha Election 2019 live result & winner: Sanjay Dhotre win forth time
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.