Grandfather's Record Break: Young Member of the Dr Sujay Vikhe District, 37-year-old parliament | आजोबांचे रेकॉर्ड ब्रेक : डॉ.सुजय विखे जिल्ह्यातील तरुण खासदार,३७ व्या वर्षी संसदेत
आजोबांचे रेकॉर्ड ब्रेक : डॉ.सुजय विखे जिल्ह्यातील तरुण खासदार,३७ व्या वर्षी संसदेत

नवनाथ खराडे
अहमदनगर : डॉ. सुजय विखे ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करून खासदार झाले. निवडणुकीचा प्रवास सुरू असताना काही विक्रम त्यांच्या नावावर जमा झाले आहेत. जिल्ह््यातील सर्वात तरुण खासदार होण्याचा मान डॉ. सुजय यांनी मिळवत आजोबा बाळासाहेब विखे यांचे रेकॉर्ड ब्रेक केले. अहमदनगर जिल्ह््याला लाभलेले सर्वात तरुण खासदार म्हणून नवीन रेकॉर्ड त्यांच्या नावावर जमा झाले.
डॉ.सुजय यांचे आजोबा बाळासाहेब विखे कोपरगाव(सध्याचा शिर्डी) मतदारसंघातून पाच तर अहमदनगर मतदारसंघातून दोन वेळा खासदार झाले. वडील राधाकृष्ण विखे कधीच लोकसभेच्या मैदानात उतरले नाहीत. सुजय यांना संसदेत पाठविण्याचे स्वप्न बाळासाहेब यांनी पाहिले. मात्र दहा वर्षापूर्वी शिर्डी मतदारसंघ राखीव झाला. यामुळे बाळासाहेब यांचे स्वप्न सत्यात उतरण्यास उशिर झाला.
आता अहमदनगर मतदारसंघातून सुजय अवघ्या ३७ व्या वर्षी खासदार झाले. नगर जिल्ह््यात कमी वयातील खासदारकीचे रेकॉर्ड आजोबा बाळासाहेब विखे यांच्या नावावर होते. आजोबा वयाच्या ३९ व्या वर्षी १९७१ मध्ये पहिल्यांदा काँग्रेसकडून कोपरगाव मतदारसंघातून खासदार झाले. त्यानंतर १९७७, १९८०, १९८४, १९८९ कोपरगाव मतदारसंघातून ते काँग्रेसकडून खासदार झाले. मतदारसंघ बदलून अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून १९९१ मध्ये त्यांनी नशीब आजमावले. न्यायालयातून त्यांनी ही निवडणूक जिकंली. त्यानंतर १९९८ मध्ये शिवसेनेकडून खासदार झाले. यानंतर पुन्हा ते कोपरगाव मतदारसंघात गेले व १९९९ मध्ये शिवसेनेकडून खासदार झाले.
अहमदनगर(पूर्वीचा दक्षिण) मतदारसंघातून १९५१ मध्ये उत्तमचंद बोगावत, १९५७ मध्ये रघुनाथ खाडीलकर, १९६२ मोतीलाल फिरोदिया तर १९६७ मध्ये अनंतराव पाटील पहिल्यांदा खासदार झाले. या सर्वांचे त्यावेळी वय ३९ वर्षाहून अधिक होते. १९७१ मध्ये अण्णासाहेब शिंदे वयाच्या ४९ व्या वर्षी पहिल्यांदा खासदार झाले. १९८० मध्ये चंद्रभान आठरे वयाच्या ६० व्या वर्षी खासदार झाले. यशवंतराव गडाख १९८४ मध्ये वयाच्या ४१ व्या वर्षी पहिल्यांदा खासदार झाले. १९९६ मध्ये वयाच्या ५५ व्या वर्षी दादापाटील शेळके, १९९९ मध्ये वयाच्या ४८ व्या वर्षी दिलीप गांधी तर २००४ मध्ये तुकाराम गडाख वयाच्या ५१ व्या वर्षी पहिल्यांदा खासदार झाले. आणि आता २०१९ मध्ये वयाच्या ३७ व्या वर्षी डॉ.सुजय विखे पहिल्यांदा खासदार झाले. यापूर्वी सर्व खासदारांचे रेकॉर्ड तर सुजय यांनी मोडले असून आजोबा बाळासाहेब विखे यांचेही रेकॉर्ड ब्रेक केले.

बहुतांश खासदार पन्नाशीनंतरच...!
कोपरगाव मतदारसंघातून १९५१ मध्ये पंढरीनाथ कानवडे पहिल्यांदा खासदार झाले. १९६२ मध्ये अण्णासाहेब शिंदे ४० व्या वर्षी, १९७१ मध्ये ३९ व्या वर्षी बाळासाहेब विखे, १९९१ मध्ये शंकरराव काळे ७० व्या वर्षी, १९९६ मध्ये भिमराव बडदे वयाच्या ४९ व्या वर्षी, १९९८ मध्ये प्रसाद तनपुरे वयाच्या ५६ व्या वर्षी खासदार झाले. शिर्डी मतदारसंघातून २००९ मध्ये वयाच्या ५९ व्या वर्षी भाऊसाहेब वाकचौरे, २०१४ मध्ये वयाच्या ५२ व्या सदाशिव लोखंडे पहिल्यांदा खासदार झाले.

 

Web Title: Grandfather's Record Break: Young Member of the Dr Sujay Vikhe District, 37-year-old parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.