Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 22:24 IST2025-12-29T22:23:05+5:302025-12-29T22:24:20+5:30
Ahilyanagar Municipal Election: राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत अहिल्यानगरमधून मोठी बातमी समोर आली.

Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत अहिल्यानगरमधून मोठी बातमी समोर आली. शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी आज अधिकृतपणे स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेली जागावाटपाची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर शिंदेसेनेने महायुतीकडे पाठ फिरवली.
अहिल्यानगर शहरात महायुतीच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. परंतु, भाजप व राष्ट्रवादीने आमच्याच सात जागांवर दावा केला. त्यांच्या अवास्तव मागण्यांमुळे आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा अनिल शिंदे यांनी सोमवारी केली. भाजप, राष्ट्रवादीमुळे ही युती तुटली, असा आरोपही त्यांनी केला.
शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीतून बाहेर पडत असल्याचे यावेळी जाहीर केले. पक्षाचे राज्य प्रवक्ते संजीव भोर, शहरप्रमुख सचिन जाधव, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, अनिल लोखंडे यावेळी उपस्थित होते. "महापालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढविण्यावर तिन्ही पक्षांचे एकमत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांशी आमची चर्चा सुरू होती", असेही अनिल शिंदे म्हणाले.
अनिल शिंदे पुढे म्हणाले की, "आम्ही २४ जागा मागितल्या होत्या. वाटाघाटीची आमची तयारी होती. आमच्या वाट्याला आलेल्या जागांवर कोण उमेदवार द्यायचे? हा आमचा अधिकार आहे. परंतु, त्यांनी आमच्या प्रभाग क्रमांक ११, १५ आणि १६ मधील सात जागांवर दावा केला. आम्ही या जागा सोडण्यास नकार दिला. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशीही चर्चा केली. दरम्यान, सोमवारी सायंकाळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विश्वासू नितीन कुंकलोळ यांच्याकडून तुमचे व आमचे जमणार नाही, असा निरोप आला. त्यानंतर आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे."
महायुतीच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता
अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेने घेतलेल्या या भूमिकेमुळे महायुतीच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. विशेषतः ज्या जागांवर शिवसेना आणि भाजपमध्ये चुरस आहे, तिथे याचा थेट फायदा विरोधी पक्षांना होऊ शकतो. आता या निर्णयावर महायुतीचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.