अमोल खताळांवरील हल्ल्याप्रकरणी बाळासाहेब थोरातांच्या पीएवर गुन्हा; खेमनर म्हणाले, "२० सेकंदाच्या वर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 09:52 IST2025-09-03T09:49:42+5:302025-09-03T09:52:37+5:30

संगमेनरचे आमदार अमोल खताळ यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी बाळासाहेब थोरात यांच्या स्वीय सहाय्यकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Case registered against Balasaheb Thorat PA in connection with the attack on Sangamenar MLA Amol Khatal | अमोल खताळांवरील हल्ल्याप्रकरणी बाळासाहेब थोरातांच्या पीएवर गुन्हा; खेमनर म्हणाले, "२० सेकंदाच्या वर..."

अमोल खताळांवरील हल्ल्याप्रकरणी बाळासाहेब थोरातांच्या पीएवर गुन्हा; खेमनर म्हणाले, "२० सेकंदाच्या वर..."

MLA Amok Khatal Attack: विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.  संगमनेरचे आमदार आमदार अमोल खताळ यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा धक्कादायक पराभव केल्यापासून तिथलं राजकारण तापलं आहे. अशातच आमदार आमदार अमोल खताळ यांच्यावर २८ ऑगस्ट रोजी येथील एका कार्यक्रमादरम्यान हल्ला झाला होता. यावेळी पोलिसांनी हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. आता याच गुन्ह्यात आता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहायक भास्कर खेमनर यांचेही नाव समाविष्ट करण्यात आल्याने या प्रकरणाची चर्चा वाढली आहे. आरोपीला चिथावणी दिल्याच्या आरोपावरून सहआरोपी म्हणून भास्कर खेमनर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

२८ ऑगस्ट रोजी आमदार खताळ हे नाशिक-पुणे महामार्गावरील मालपाणी लॉन्स येथे संगमनेर फेस्टिव्हल उद्घाटनासाठी आले होते. त्यांचे भाषण झाल्यानंतर नागरिकांशी हस्तांदोलन करत ते रात्री पावणेआठच्या सुमारास बाहेर पडत होते. ते कार्यक्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आले असता प्रसाद अप्पासाहेब गुंजाळ याने हस्तांदोलन करण्याचा बहाणा करत त्यांच्यावर अचानक हल्ला केला होता. त्याच्याविरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचे कलम १०९, ३५१(१) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. गुंजाळ याला न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. या गुन्ह्याचा पोलिस तपास करत असताना खेमनर यांनी गुन्हा करण्यासाठी चिथावणी दिली म्हणून भारतीय न्याय संहितेचे कलम ४९ नुसार त्यांचेही नाव गुन्ह्यात समाविष्ट करण्यात आले आहे, असेही पोलिसांनी सांगितले. 

बाळासाहेब थोरात यांना बदनाम करण्यासाठी खेळ सुरू - भास्कर खेमनर

"माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करतो. मला दररोज विविध कामांच्या निमित्ताने शेकडो फोन येत असतात. लोक थोरात यांच्या भेटीसाठी वेळ मागतात किंवा काही शासकीय कामकाज सांगत असतात. आमदार खताळ हल्ला प्रकरणात माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यक्तिगत व्यवहाराच्या प्रकरणाला राजकीय स्वरूप देण्याच्या दृष्टीने माझ्यावर हे षडयंत्र केले गेले आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकाराचा निरपेक्ष तपास करावा, माजी मंत्री थोरात यांना बदनाम करण्यासाठी हा सर्व खेळ सुरू आहे. प्रसाद गुंजाळ नावाच्या या व्यक्तीला मी ओळखतही नाही. बाळासाहेब थोरात यांना भेटण्याची विचारणा करणाऱ्या त्या १५ ते २० सेकंदाच्या फोन पलीकडे त्याचे माझे आजवर कोणतेही बोलणे नाही. या घटनेशीही माझा दूरपर्यंत संबंध नाही," अशी प्रतिक्रिया भास्कर खेमनर यांनी दिली.
 

Web Title: Case registered against Balasaheb Thorat PA in connection with the attack on Sangamenar MLA Amol Khatal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.