पणजी मतदारसंघ कधीच सोडणार नाही: मंत्री बाबूश मोन्सेरात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2024 09:18 AM2024-04-30T09:18:23+5:302024-04-30T09:19:21+5:30

कोणी कितीही स्वप्ने पाहिली तरी ती पूर्ण होणार नाहीत

panaji constituency will never leave said babush monserrate | पणजी मतदारसंघ कधीच सोडणार नाही: मंत्री बाबूश मोन्सेरात 

पणजी मतदारसंघ कधीच सोडणार नाही: मंत्री बाबूश मोन्सेरात 

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: 'मी पणजी कदापि सोडणार नाही. कोणी कितीही स्वप्ने पाहिली तरी ती पूर्ण होणार नाहीत', असे म्हणत स्थानिक आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यानी अप्रत्यक्षपणे उत्पल पर्रीकर यांना टोला लगावला आहे.

ताळगाव पंचायत निवडणुकीतील भरघोस यशानंतर बाबूश यांचा उत्साह आणखी व्दिगुणीत झालेला आहे. पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, 'ताळगाव माझ्याकडे आहेच. मी पणजीदेखील कदापि सोडणार नाही. काहीजण पणजीवर राज्य करण्याची स्वप्ने पाहत आहेत. मी असेपर्यंत त्यांना ते कधीच शक्य होणार नाही.'

या लोकांनी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत मला सामोरे जावे, असे आव्हान आणखी एकदा काल बाबूश यांनी दिले. '२०२७ च्या निवडणुकीत भाजपने पणजीत अन्य कोणाला तिकीट दिले तर तुम्ही काय करणार?' असा प्रश्न केला असता बाबूश म्हणाले की, 'ज्याच्याकडे जिंकण्याची ताकद आहे, त्यालाच पक्ष उमेदवारी देतो. त्यामुळे या गोष्टीची मी पर्वा करत नाही. भाजपमध्ये गेल्यापासून मी निष्ठेने या पक्षाचे काम करीत आहे. कधीही विरोधात काम केलेले नाही. त्यामुळे पक्ष माझ्यावर अन्याय करणार नाही याची खात्री मला आहे.'

ताळगांवमध्ये मार्केट इमारत बांधून देण्यासाठी माझे प्राधान्य राहील. त्यासाठी भूसंपादन झालेले असून, मुख्यमंत्र्यांना भेटून जीएस- आयडीसीकडून या कामाला चालना दिली जाईल, असे मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सांगितले. दुसरीकडे, पणजीला लागलेली साडेसाती पुढील निवडणुकीत आम्हाला दूर करावी लागेल. त्याला अद्याप उशीर आहे, अशी प्रतिक्रिया उत्पल पर्रीकर यांनी दिली आहे.

एक तरी शेतजमीन रूपांतरित केल्याचे दाखवा : बाबूश

एका प्रश्नावर बाबूश म्हणाले की, 'लोक जमिनी विकताहेत, त्यांना आम्ही अडवू शकत नाही. जे विरोधक माझ्यावर आरोप करतात, त्यांनी माझ्या नावे एक तरी शेतजमीन असल्यास दाखवावी किंवा मी शेतजमीन रूपांतरित केली असल्यास सिद्ध करावे. लोक जर शेतजमिनी विकत असतील तर त्यांना आम्ही थांबवू शकत नाही. ताळगावची ९९ टक्के कृषी जमीन कोमुनिदादीच्या मालकीची आहे.

स्वतःला बलाढ्य म्हणवणाऱ्याने आताच नांगी टाकली : उत्पल

बाबूश मोन्सेरात यांनी लगावलेल्या टोल्यास प्रत्युत्तर देताना उत्पल पर्रीकर म्हणाले की, मुख्य म्हणजे ही निवडणूक पणजीची नव्हती, तर ताळगाव पंचायतीची होती. पणजीला लागलेली साडेसाती आम्ही भोगतोय. ही साडेसाती आम्हालाच दूर करावी लागणार आहे, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीला अजून अवकाश आहे. स्वतःला बलाढ्य म्हणवणाऱ्याने आताच नांगी टाकली, फेब्रुवारी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाची तिकीट किवा चिन्ह मिळाले नसते तर या माणसाची काय गत झाली असती, हे सर्वांनाच त्यावेळी निकालावरून कळले.'

 

Web Title: panaji constituency will never leave said babush monserrate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.