- माधवी वागेश्वरी
नॉर्मल’ म्हणजे नक्की काय असतं? काय केलं असता सगळं काही नॉर्मल होऊन जातं? कोण ठरवत असतं की आपण नॉर्मल असतो की अ‍ॅबनॉर्मल? कोण असतात हे लोक जी ही सगळी ‘ठरवाठरवी’ करत असतात? किंवा कुठे असते ती व्यवस्था जी आपल्या कपाळावर ‘नॉर्मल’ नावाचे शिक्के मारत असते? आणि ‘नॉर्मल’ राहण्यानं नेमकं होतं काय? कोण ठरवतं हे म्हणजे ‘परफेक्ट’? आणि हे म्हणजे ‘परफेक्ट नाही’ असे प्रश्न विचारून भंडावून सोडवणारी फिल्म म्हणजे, ‘द स्टेफर्ड वाइव्हज’.
‘द स्टेफर्ड वाइव्हज’ ही २००४ची अमेरिकन सायन्स फिक्शन कॉमेडी फिल्म आहे. ही फिल्म फ्रँक ओझ यांनी दिग्दर्शित केलेली आहे. आयरा लेविन यांच्या ‘द स्टेफर्ड वाइव्हज’ यांच्या कादंबरीवर आधारित ही फिल्म असून, १९७५ साली आलेल्या फिल्मचा हा रिमेक आहे. निकोल किडमननं यात मुख्य भूमिका साकारलेली आहे. मॅथ्यू ब्रोड्रिक, ख्रिस्तोफर वॉल्कन, ग्लेन कोझ यांनी यात काम केलं आहे. ही गोष्ट आहे जोहानाची, एका टेलिव्हिजन चॅनलवर एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम करणाºया जोहानाला नोकरीवरून काढून टाकण्यात येतं. तिचं डिप्रेशन घालवण्यासाठी तिचा नवरा, वॉल्टर, तिला आणि लहान मुलांना घेऊन कुटुंबांसाठी स्टेफर्ड नावाच्या अत्यंत रम्य टाउनमध्ये राहण्यासाठी येतो.
तिथे लेखिका आणि अल्कोहोलिक असलेली बॉबी आणि गे असलेल्या रॉजर सोबत जोहानाची मैत्री होते. हळूहळू जोहानाला स्टेफर्ड टाउनविषयी आणि इथे राहणाºया लोकांविषयी माहिती कळू लागते आणि तिला विचित्र वाटू लागतं. ते टाउन आणि तिथली माणसं इतकी पराकोटीची ‘परफेक्ट’ असतात की तिला ते सगळं पचायला खूपच जड जाऊ लागतं. कायम हसतमुख असणाºया बायका, त्यांची ती कायम शेपमध्ये असलेली फिगर, नवºयाला कायम खूश ठेवण्यात धन्यता मानणाºया त्या स्त्रिया पाहून ती चक्र ावून जाते. जोहाना, बॉबी आणि रॉजरला ‘स्टेफर्ड मेन असोसिएशन’ नावाच्या एका प्रचंड सोफिस्टिकेटेड आणि भयंकर संघटनेविषयी कळतं. ज्यांनी आपल्या बायकांना रोबोटमध्ये रूपांतरित केलेलं असतं आणि हे सगळं इथपर्यंत थांबत नाही तर या सगळ्यात बॉबीचा बळीदेखील जातो. स्टेफर्ड टाउनच्या आणखी तळाशी असलेल्या रहस्याचा उलगडा जेव्हा जोहानाला होतो ते पाहून प्रेक्षक म्हणून आपल्यादेखील अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.
‘स्टेफर्ड’ या शब्दाचा अर्थ आहे अशी व्यक्ती जी प्रचंड आज्ञाधारक आहे, इतकी की जी अजिबात स्वत:चं डोकं वापरत नाही, अक्षरश: रोबोटसारखी वागते. ‘स्टेफर्ड वाइव्हज’ म्हणजे अशा बायका, ज्या नवºयाची प्रत्येक शारीरिक आणि अन्य गरजा हसतमुखानं पूर्ण करतात, विशेष म्हणजे त्यांना त्यातच जगण्याची सार्थकता वाटते अशा या बायका.
अमेरिकेत स्त्री वादाची चळवळ जेव्हा भरात होती त्या सुरुवातीच्या काळात म्हणजे १९७२च्या सुमारास ‘स्टेफर्ड वाइव्हज’ ही कादंबरी लिहिली गेलेली आहे. त्यामुळे त्या काळानुसार यात गोष्टी असल्या तरी यातील बहुतांश भाग हा आजही लागू पडणारा आहे.
आपल्या भारतीय समाजात तर अजूनही ‘लग्न’ म्हणजे जगण्याचा अपरिहार्य भाग समजला जातो. लग्नबंधनात नवरा बायकोनं कसं वागायचं याचे ठोकताळे ठरलेले आहेत. त्यानुसार लोकं वागताना दिसतात. आजकाल सहजपणे प्रेमविवाहांना ‘पालक’ संस्थेकडून मान्यता मिळत असली तरी, लग्न करताना तरुण-तरुणी (काही अपवाद सोडता) शक्यतो फार कमी डोकं वापरणंच पसंत करतात. आपले आईवडील आपल्याला हव्या त्या मुलासोबत/मुलीसोबत लग्न करू देत आहेत हेच खूप झालं. आता सगळं काही त्यांच्या मनासारखं वागू एवढाच काय तो त्यांचा प्रेमासाठीचा अशक्त बंड असतो. ‘विचार करणं’ आणि ‘जगणं’ हे दोघे एकमेकांशी पाठ करून बसले की काय, असा प्रश्न पडावा, असा हा सर्व प्रकार आहे. पण ‘जोहाना’सारख्या स्त्रीला प्रश्न पडतात, सरळसोट मार्ग असलेल्या रस्त्यावरून चालायला ती नकार देते, कितीही कष्ट पडले, त्रास झाला, कितीही असुरक्षितता वाट्याला आली तरी चालेल; पण ती स्वत:च्या बुद्धीनं विचार करण्याचाच आग्रह धरते. चुका करायला ती घाबरत नाही. कशी का असेना, पण स्वत:ची काही तरी भूमिका असली पाहिजे याचा स्वत:शी हट्ट धरते.
गोष्ट म्हणून यात वापरलेले विज्ञान, नाट्य, विनोद हे सगळं महत्त्वाचं आहेच कारण ते तुम्हाला गुंतवून ठेवतं; पण त्याच्या मुळाशी असलेली बाब म्हणजे, काळ कोणताही असो आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीविषयी प्रश्न पडले पाहिजेत ही आहे. आपण आपले ‘ड्रायव्हिंग फोर्स’ नेमके काय आहेत ते शोधले पाहिजेत. आपण सर्वजण कायम कशाच्या तरी प्रभावाखाली येऊन निर्णय घेत असतो. अदृश्य अशी राजकीय आणि धार्मिक व्यवस्था आपल्या जगण्याची धारणा ठरवत असते. जी आपल्याला सतत नियमांची, कायद्याची, संस्कारांची भीती घालत असते. पाप-पुण्य नावाच्या भ्रमात आपल्याला सोडून आपली गंमत पाहात बसते. दहशतवादी लोकांना ट्रेन करण्यासाठी त्यांचा आधी ‘ब्रेनवॉश’ केला जातो. तो असा असतो की, ते स्वत:च्या गळ्यात बॉम्बची माळ घालायलादेखील मागे-पुढे पहात नाहीत. असाच ‘ब्रेनवॉश’ आपलादेखील कितीतरी गोष्टींसाठी केला जातो. आपलं शरीर, मेंदू, मन कोणासाठी तरी रोबोटसारखं तर काम करत नाहीये ना? या प्रश्नाचा कायमचा भुंगा लावण्याचं काम हा सिनेमा नक्कीच करतो.

(लेखिका चित्रपट आणि दृश्य माध्यमाच्या अभ्यासक आहेत. madhavi.wageshwari@gmail.com)


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.