भाजपाच्या 'मिशन बारामती'ला सुरुंग?; मित्रपक्षाकडूनच फटका बसण्याची दाट शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 01:57 PM2022-10-13T13:57:07+5:302022-10-13T14:02:24+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनंतर भाजपाने देशभरात १५० मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करण्याचं ठरवलं आहे. त्यात प्रामुख्याने बारामती मतदारसंघाचाही समावेश आहे. येत्या लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत बारामतीवर भाजपाचा झेंडा फडकविण्यासाठी नियोजन केले जात आहे. याचाच भाग म्हणून भाजपानं मिशन बारामती हाती घेतले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सीतारामण यांनी बारामतीत दौरा करत लोकसभा क्षेत्रात विविध कार्यक्रम व बैठकांतून कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

आगामी २०२४ च्या लोकसभेच्या दृष्टीने भाजपानं तयारीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात ४५ जागा निवडून आणण्यासाठी भाजपा प्रयत्न करत आहेत. त्यात शरद पवारांचं वर्चस्व असलेल्या बारामतीवर भाजपानं लक्ष केंद्रीत केले आहे. यात काही दिवसांपूर्वी महादेव जानकर यांनी जर योग्य प्लॅनिंग केले तर राष्ट्रवादीचा पराभव अटळ आहे असं सांगत भाजपाला सल्ला दिला होता.

परंतु इंदापूरात झालेल्या राष्ट्रीय समाज पार्टीच्या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर हे बारामतीतून उभे राहतील असं सांगत त्यांच्या उमेदवारीची घोषणाच केली आहे. रासपचे पदाधिकारी काशिनाथ शेवते यांनी याबाबत मेळाव्यात सूचक विधान केले आहे.

काशिनाथ शेवते म्हणाले की, बारामती लोकसभा मेळाव्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यात सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव महादेव जानकर यांना निवडणुकीत उभे करून रासपच्या माध्यमातून १०० टक्के निवडून आणणारच असा विश्वास व्यक्त केला.

२०१४ च्या निवडणुकीत भाजपानं बारामती लोकसभेची जागा मित्रपक्ष रासपाला सोडली होती. याठिकाणी महादेव जानकर उभे राहिले होते. मात्र त्यांनी कमळ चिन्हाऐवजी रासपच्या कपबशी चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी आग्रह धरला. या निवडणुकीत जानकरांना पावणे पाच लाख मतदान झाल्याने सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य घटले होते.

भाजपाच्या मिशन बारामतीवर महादेव जानकर म्हणाले होते की, बारामती लोकसभा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर एकाबाजूला धरण आणि दुसऱ्याबाजूला पाण्यासाठी घशाला कोरड पडली अशी अवस्था आहे. इंदापुर तालुक्यातील ३२ आणि बारामतीतील २६ गावांच्या पाण्याचा प्रश्न तसाच आहे. मुळशी, दौंड याठिकाणीही समस्या प्रलंबितच आहे. निर्मला सीतारामन या बारामतीत लक्ष देत असतील तर त्यांचं अभिनंदन आहे.

त्याचसोबत बारामतीच्या जनतेचे माझ्यावर उपकार आहेत. मला पावणे पाच लाख मतदान केले होते. भाजपा हा मोठा पक्ष आहे. त्यांना सल्ला देण्याइतपत मी मोठा नाही. भाजपानं रासपला हा मतदारसंघ द्यायला हवा होता. २०१९ मध्ये भाजपाच्या उमेदवाराला माझ्याएवढे मतदान झाले नव्हते हेदेखील पक्षाने लक्षात ठेवलं पाहिजे. उमेदवारांच्या दृष्टीने भाजपाने एकाच व्यक्तीवर फोकस ठेवला पाहिजे हा माझा सल्ला आहे असं सांगत जानकरांनी रासपाला हा मतदारसंघ सोडावा अशी सूचक मागणी केली होती.

दरम्यान, शरद पवार हे देशाचे नेते आहेत. पण बारामतीत प्रत्यक्षात वस्तूस्थिती तशी नाही. बारामती लोकसभा मतदारसंघातील ७५ टक्के भाग विकासापासून वंचित आहे. खडकवासला शहरी भाग असून विकास नाही. पुरंदरची अवस्था आजही वाईट आहे. जर व्यवस्थित प्लॅनिंग केले तर बारामतीत लोकसभेतही परिवर्तन घडू शकतं असंही जानकरांनी म्हटलं होते.

तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधीही पराभूत होतात त्यामुळे बारामतीत अशक्य असं काही नाही. शरद पवारांच्या दबावाला कुठल्याही राजकीय पक्षाने बळी पडू नये. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी बारामतीबाबत कुठलीही चर्चा नाही. २०१९ मध्ये ती जागा मागितली होती परंतु दिली नाही. भाजपानं रासपला जागा दिली तर ती जागा लढवण्यास तयार आहे असं महादेव जानकर यांनी स्पष्टपणे सांगितले होते. त्यात आता रासपा कार्यकर्त्यांनी मेळावा घेत जानकरांनी ही जागा लढवावी असा निर्धार व्यक्त केला आहे.