काय सांगता! वय वर्षे १२ अन् जेवणात खातो तब्बल ४० चपात्या; डॉक्टरही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 01:42 PM2021-08-04T13:42:24+5:302021-08-04T13:47:54+5:30

मध्य प्रदेशच्या ग्लाव्हेर शिवपुरी जिल्ह्यातील एक १२ वर्षांचा मुलगा जेवताना तब्बल ४० चपात्या खातो. कारण ऐकून डॉक्टरही चक्रावून गेले.

ग्वाल्हेर: आपल्या देशात अनेकविध भन्नाट गोष्टी, किस्से, घटना घडत असतात. काही घटनांमुळे संपूर्ण देश हादरतो, तर काही गोष्टी चर्चेचा विषय होतात. काही किस्से सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.

लहान मुलांचे किस्से तर इतके भन्नाट असतात की, लगेचच त्याला प्रसिद्धी मिळत असते. अशीच एक घटना मध्य प्रदेशामधील ग्वाल्हेरमधील शिवपुरी जिल्ह्यात घडली आहे. मात्र, या घटनेमुळे डॉक्टरही चक्रावून गेले आहेत.

शिवपुरी जिल्ह्यातील एक १२ वर्षांचा मुलगा जेवताना तब्बल ४० चपात्या खातो, हे ऐकून डोके चक्रावले ना. शिवपुरी जिल्ह्यातील या मुलाचे नाव संदिप असे आहे. संदिपने ४० चपात्या खाल्ल्या त्यानंतरही त्याच्या घरच्यांनी त्याकडे फार गांभीर्याने पाहिले नाही. मात्र, काही दिवसांनी त्याच्या एका डोळ्याची दृष्टीच गेली. (12 year old boy eats 40 chapatis)

संदीपची दृष्टी अधू झाल्याचे समजताच घरचे घाबरले आणि लगेचच त्याला डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्यावेळी वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी जे कारण सांगितले ते ऐकून घरचे अवाक झाले. (12 year old boy with 1206 mg blood sugar level)

जेवताना ४० चपात्या खाणाऱ्या संदिपची तपासणी केली असता डॉक्टरांना १२०६ एमजी सुगर लेव्हल आढळली आणि डॉक्टरही चक्रावले. डॉक्टर तपासणी करत असतानाच संदिपचे डोके भयानक दुखू लागले.

त्यानंतर संदिप केवळ श्वास घेत होता, मात्र त्याची हालचाल बंद झाली. शरीराने काम करणे बंद केल्याचे समजले. शरीरातील साखरेचे प्रमाण खूप अधिक असल्यानेच तो ४० चपात्या खात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

तपासणीत संदिपच्या डोक्यात पू तयार झाल्याचे समोर आले. यानंतर डॉक्टरांनी डोक्यावर शस्त्रक्रिया करुन तब्बल ७२० मिलीलीटर पू बाहेर काढला. डोक्यात पू तयार झाल्यानेच त्याची दृष्टी गेली होती.

डॉक्टरांनी संदिपची साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी त्याला इंसुलिनचे ६ युनिट दिले. यानंतर संदिपची साखर पातळी सामान्य होऊन त्याला शुद्ध आली.

डॉक्टरांनी त्याची डोळ्यांची तपासणी केली आणि तातडीने नेत्र शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. पालकांनीही तातडीने तयारी दर्शवली. त्यामुळे संदीपच्या उजव्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाली आणि त्याची दृष्टी पूर्ववत झाली.

या संपूर्ण घटनाक्रमात डॉक्टरांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत संदीपला पुनर्जन्म दिल्याचे सांगितले जात आहे. संदीपची प्रकृती उत्तम असून, तो वेगाने रिकव्हर होत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.