दोन दिवसांत दोन खासदारांनी सोडला पक्ष, आता राहुल कस्वां यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 04:12 PM2024-03-11T16:12:16+5:302024-03-11T16:12:44+5:30

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात केल्यापासून पक्षाला काही ठिकाणी गळती लागल्याचे चित्र आहे. मागच्या दोन दिवसांमध्ये दोन विद्यमान खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

Two MPs left the party in two days, now Rahul Kaswan has joined the Congress | दोन दिवसांत दोन खासदारांनी सोडला पक्ष, आता राहुल कस्वां यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

दोन दिवसांत दोन खासदारांनी सोडला पक्ष, आता राहुल कस्वां यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात केल्यापासून पक्षाला काही ठिकाणी गळती लागल्याचे चित्र आहे. मागच्या दोन दिवसांमध्ये दोन विद्यमान खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. हिसारमधील खासदार बृजेंद्र सिंह यांच्यानंतर आता राजस्थानमधील चूरू येथील खासदार राहुल कस्वां यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर राहुल कस्वां यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

राहुल कस्वां हे भाजपाकडून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. तर त्यांचे वडील रामसिंह कस्वां हे भाजपाकडून तीन वेळा खासदार राहिले होते. भाजपाने काही दिवसांपूर्वीच आपली पहिली उमेदवारी यादी प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये पक्षाने काही खासदारांचं तिकीट कापलं होतं. ज्यांना उमेदवारी नाकारली होती, त्यातील अनेकांनी पक्षाचा निर्णय मान्य केला. मात्र राहुल कस्वां यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर बंडाचा झेंडा खांद्यावर घेतला होता. अखेर आज ते काँग्रेसवासी झाले.

चुरू येथील विद्यमान खासदार असलेले राहुल कस्वां हे काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले की, काँग्रेसमध्ये दाखल झाल्याबद्दल मी राहुल कस्वां यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. अशा विचारसरणीची मंडळी काँग्रेसमध्ये आली तर भाजपा कुठेच राहणार नाही. भाजपा घाबरवणं-धमकावण्याचं काम नेहमीच करत आला आहे. मात्र आम्हाला राहुल कस्वांसारख्या लोकांची आवश्यकता आहे.

दरम्यान, एक दिवस आधीच हरियाणामधील हिसार लोकसभा मतदारसंघातील भाजपा खासदार बृजेंद्र सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. भाजपा सोडून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत ते काँग्रेसमध्ये दाखल झाले होते.   

Web Title: Two MPs left the party in two days, now Rahul Kaswan has joined the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.