भाजप नेत्यांकडून अचानक नावासमोर 'मोदी का परिवार' लिहिण्यास सुरुवात; निवडणुकीआधी विरोधकांकडून आयतं कोलीत?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 02:29 PM2024-03-04T14:29:58+5:302024-03-04T14:36:33+5:30

नरेंद्र मोदी यांच्या नव्या घोषणेनंतर भाजपच्या देशभरातील नेत्यांनीही मोदींच्या घोषणेला प्रतिसाद देत आपल्या नावासमोर 'मोदी का परिवार' असं लिहिण्यास सुरुवात केली आहे.

BJP leaders suddenly started writing Modi Ka Parivar in front of their names on social media | भाजप नेत्यांकडून अचानक नावासमोर 'मोदी का परिवार' लिहिण्यास सुरुवात; निवडणुकीआधी विरोधकांकडून आयतं कोलीत?

भाजप नेत्यांकडून अचानक नावासमोर 'मोदी का परिवार' लिहिण्यास सुरुवात; निवडणुकीआधी विरोधकांकडून आयतं कोलीत?

PM Narendra Modi ( Marathi News ) : बिहारमधील पाटणा इथं काल विरोधकांच्या इंडिया आघाडीची विशाल सभा पार पडली. गांधी मैदानात झालेल्या या सभेला राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना राजदचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. "नरेंद्र मोदी हे हिंदू नाहीत, कारण प्रत्येक हिंदू आपल्या आईचा मृत्यू झाल्यानंतर केस आणि दाढी काढतो. मात्र मोदींनी असं केलं नाही. ते घराणेशाही म्हणत लोकांवर टीका करतात, मात्र त्यांना कुटुंबच नाही," असं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं होतं. लालू यांच्या या टीकेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. "देशातील प्रत्येक गरीब व्यक्ती माझं कुटुंब आहे. ज्याचा कोणी नाही त्याचा मोदी आहे. आता संपूर्ण देशही आम्ही मोदींचे कुटुंब आहोत, असं म्हणतोय," अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी 'मैं हू मोदी का परिवार' अशी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी घोषणा दिली आहे.

नरेंद्र मोदी यांच्या या भाषणानंतर भाजपच्या देशभरातील नेत्यांनीही मोदींच्या घोषणेला प्रतिसाद देत आपल्या नावासमोर 'मोदी का परिवार' असं लिहिण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश आहे. तुम्हाला कुटुंबच नाही, अशी टीका करणाऱ्या विरोधकांना 'हा देश हेच माझं कुटुंब आहे,' असं म्हणत भावनिक अस्त्र वापरत नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिल्याचं बोललं जात आहे.

२०१९ ची पुनरावृत्ती

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौकीदार चोर है, असं म्हणत हल्ला चढवला होता. या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देत 'मै भी चौकीदार' ही मोहीम देशभर राबवण्यात आली होती. भाजपच्या प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर आपल्या नावासमोर 'मै भी चौकीदार' असं लिहिलं होतं. त्यानंतर यंदाच्या निवडणुकीतही भाजपने 'मोदी का परिवार' ही मोहीम राबवत २०१९ ची पुनरावृत्ती केल्याचं दिसत आहे.

Web Title: BJP leaders suddenly started writing Modi Ka Parivar in front of their names on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.