भुजबळांचा मोठा खुलासा: नाशिकमधून उमेदवारी देण्यासाठी अजित पवार-पटेलांना थेट दिल्लीतून सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 01:36 PM2024-04-11T13:36:15+5:302024-04-11T13:48:36+5:30

Nashik Lok Sabha: छगन भुजबळ यांनी उमेदवारीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठींकडून अजित पवारांच्या पक्षाच्या उमेदवारीतही हस्तक्षेप केला जातो का, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

BJP instructs Ajit Pawar to nominate chhagan Bhujbal from Nashik lok sabha seat | भुजबळांचा मोठा खुलासा: नाशिकमधून उमेदवारी देण्यासाठी अजित पवार-पटेलांना थेट दिल्लीतून सूचना

भुजबळांचा मोठा खुलासा: नाशिकमधून उमेदवारी देण्यासाठी अजित पवार-पटेलांना थेट दिल्लीतून सूचना

NCP Chhagan Bhujbal ( Marathi News ) : महायुतीच्या जागावाटपात नाशिक लोकसभा मतदारसंघ उपमुख्यमत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना महायुतीकडून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे. अशातच भुजबळ यांनी आपल्या उमेदवारीबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. "अजित पवारांनी महायुतीकडे नाशिकची जागा मागितली आहे. मात्र तुम्हाला ही जागा घ्यायची असेल तर घ्या, पण तिथून छगन भुजबळ यांनाच उमेदवारी द्या, असं वरून अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना सांगण्यात आल्याचं त्यांनीच मला सांगितलं," असा दावा छगन भुजबळांनी केला आहे.

भाजप नेतृत्वाकडून छगन भुजबळ यांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठीही विचारणा करण्यात आल्याचं बोललं जात होतं. मात्र ही चर्चा भुजबळांनी फेटाळून लावली आहे. "या चिन्हावर, त्या चिन्हावरच लढा, यासाठी माझ्याकडे कोणी मागणी केलेली नाही, विचारणा केलेली नाही, अट टाकलेली नाही," असा खुलासा भुजबळ यांनी केला आहे.  

दरम्यान, छगन भुजबळ यांनी उमेदवारीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठींकडून अजित पवारांच्या पक्षाच्या उमेदवारीतही हस्तक्षेप केला जातो का, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

ठाकरेंचं ठरलं, महायुतीकडून उमेदवाराची घोषणा कधी?

नाशिकच्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे यांच्या नावाची अधिकृत घोषणा होऊन आता जवळपास दोन आठवड्यांचा कालावधी होत आला आहे. त्यामुळे महायुतीकडून उमेदवार घोषणेचा खेळ सुरू असताना वाजे यांच्या प्रचाराला अधिकाधिक वेळ मिळणे ही बाब महायुतीच्या उमेदवाराच्या दृष्टीने सर्वाधिक त्रासदायक ठरू शकते. प्रचारासाठी आता केवळ ४० दिवसांचा कालावधी उरलेला असूनही महायुतीचे तिन्ही पक्ष आग्रही राहिले असल्याने उमेदवारीचा तिढा नव्हे गुंता झाला असल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे.

नाशिकची जागा अजित पवारांना मिळण्याची शक्यता का?

भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले हे साताऱ्यातून पुन्हा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने साताऱ्याची जागा सोडावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. त्या बदल्यात राष्ट्रवादीला नाशिक लोकसभा मतदारसंघ सोडण्याबाबत युतीत विचारविनिमय सुरू आहे. मात्र या भूमिकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं तीव्र विरोध केल्याने अद्याप नाशिकमधील उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही.  

Web Title: BJP instructs Ajit Pawar to nominate chhagan Bhujbal from Nashik lok sabha seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.