बारामतीत सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब?; भाजपच्या महिला नेत्याचं विधान चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 03:14 PM2024-03-04T15:14:27+5:302024-03-04T15:17:15+5:30

सुनेत्रा पवार या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

Sunetra Pawars candidacy confirmed in Baramati BJP chitra wagh statement | बारामतीत सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब?; भाजपच्या महिला नेत्याचं विधान चर्चेत

बारामतीत सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब?; भाजपच्या महिला नेत्याचं विधान चर्चेत

Sunetra Pawar Baramati ( Marathi News ) :बारामती लोकसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. कारण या मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच पवार कुटुंबातील दोन व्यक्ती आमने-सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीत झालेल्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि मतदारसंघातील विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. मात्र सुनेत्रा पवार यांच्या उमदेवारीची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. असं असताना भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केलेलं एक वक्तव्य चर्चेचा विषय ठरलं आहे. 

"बारामती लोकसभा मतदारसंघातून यंदा सुनेत्रा पवार बाजी मारणार, असा महायुतीला विश्वास आहे," असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं आहे. लोणावळ्यात "रन फॉर नेशन, रन फॉर मोदी" मॅरेथॉनला चित्रा वाघ यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी वाघ यांनी हे वक्तव्य केलं आहे. सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित झाल्यामुळेच चित्रा वाघ यांनी पवार यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केल्याचं बोललं जात आहे.

सुनेत्रा पवारांची उमेदवारी सुप्रिया सुळेंसाठी मोठं आव्हान

सुनेत्रा पवार या खरंच लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या तर विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना कठीण आव्हानाचा सामना करावा लागू शकतो. कारण अजित पवार यांचे बारामती लोकसभा मतदासंघात येणाऱ्या सर्व सहा विधानसभा मतदारसंघांत कार्यकर्त्यांचं प्रचंड नेटवर्क आहे. त्यांच्या जोडीला भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची ताकदही असणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान, या मतदारसंघात अजित पवार यांची ताकद असली तरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना मानणारा खूप मोठा वर्गही या मतदारसंघात आहे. याचीच प्रचिती बारामतीत शनिवारी महायुतीच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या ‘नमो महारोजगार मेळाव्या’त आली. यामध्ये अनेक राजकीय  खलबते होणार, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती; मात्र संपूर्ण कार्यक्रमावर कोणीही टीकाटिप्पणी केली नाही. मात्र व्यासपीठावर शरद पवारांचे आगमन झाल्यानंतर, तसेच त्यांच्या भाषणावेळी  बारामतीकरांनी तुफान टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून जल्लोष केला. त्यामुळे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत झाल्यास मोठी चुरस निर्माण होणार आहे.

Web Title: Sunetra Pawars candidacy confirmed in Baramati BJP chitra wagh statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.