अजित पवारांना धक्का? नीलेश लंके आज शरद पवार गटात घरवापसी करण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 08:17 AM2024-03-14T08:17:43+5:302024-03-14T08:18:57+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून नीलेश लंके हे शरद पवार गटात पुन्हा परततील असं बोललं जात होतं

Shock to Ajit Pawar? NCP MLA Nilesh Lanke likely to return to Sharad Pawar group today | अजित पवारांना धक्का? नीलेश लंके आज शरद पवार गटात घरवापसी करण्याची शक्यता

अजित पवारांना धक्का? नीलेश लंके आज शरद पवार गटात घरवापसी करण्याची शक्यता

अहमदनगर - भाजपाने अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यात आज गुरुवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नीलेश लंके हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे अहमदनगर मतदारसंघात विखे-लंके यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे. 

२०१९ च्या लोकसभा निवणुकीपूर्वी डॉ. विखे पाटील यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपामध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळविली होती. त्यांनी या मतदारसंघातून विजयही मिळविला. त्यामुळे यावेळीही तेच उमेदवारीचे प्रमुख दावेदार होते. मात्र, भाजपामधून प्रा. राम शिंदे, प्रा. भानुदास बेरड यांनीही उमेदवारीची मागणी केली होती. भाजपाने विखे यांचीच उमेदवारी जाहीर केली आहे.

दरम्यान, पारनेरचे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार लंके हे महाविकास आघाडीकडून लोकसभेचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. लंके गुरुवारी पुण्यात पुन्हा घरवापसी करत शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पक्ष प्रवेशाचे निरोपही कार्यकर्त्यांना आले आहेत.याबाबत लंके यांनी अधिकृतपणे काहीही घोषणा केलेली नाही. प्रवेशानंतरच ते भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नीलेश लंके हे शरद पवार गटात पुन्हा परततील असं बोललं जात होतं. याबाबत अजित पवारांनाही विचारलं असता, लंके कुठेही जाणार नाही, ही चर्चा केवळ माध्यमात आहे असा दावा केला होता. परंतु लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसं राज्यातील राजकारणात बऱ्याच उलथापालथी पाहायला मिळत आहे.  

नीलेश लंके हे विखेंचे प्रबळ विरोधक मानले जातात. त्यामुळे महाविकास आघाडीकडून तेच उमेदवार असतील, हे जवळपास निश्चित मानले जाते. दरम्यान, शिंदे, बेरड यांनी भाजपाकडून उमेदवारीची मागणी केली होती. त्यांच्या प्रतिक्रिया समजू शकल्या नाहीत.

विकासाचा मुद्दा घेऊन आपण राजकारण करत आहोत. केंद्रीय समितीने आपणाला पुन्हा उमेदवारी दिली आहे. मोदी यांच्या चारशे पारच्या नाप्यात आपला सहभाग असेल. महायुतीतील सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन विजय पुन्हा खेचून आणू, डॉ. सुजय विखे पाटील

Web Title: Shock to Ajit Pawar? NCP MLA Nilesh Lanke likely to return to Sharad Pawar group today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.