“संविधान संपवण्याची भाषा आमची नाही तर RSS अन् भाजपावाल्यांचीच”; काँग्रेसची NDAवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 09:56 AM2024-04-11T09:56:38+5:302024-04-11T09:57:36+5:30

Congress Nana Patole News: गेल्या १० वर्षांत जनतेला देशोधडीला लावलेल्या भाजपा व एनडीएला जनता पुन्हा मत का देईल, अशी विचारणा करण्यात आली आहे.

nana patole replied bjp rss and pm narendra modi over criticism on congress in rally for lok sabha election 2024 | “संविधान संपवण्याची भाषा आमची नाही तर RSS अन् भाजपावाल्यांचीच”; काँग्रेसची NDAवर टीका

“संविधान संपवण्याची भाषा आमची नाही तर RSS अन् भाजपावाल्यांचीच”; काँग्रेसची NDAवर टीका

Congress Nana Patole News: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकारण काँग्रेसने संपवले हा नरेंद्र मोदी यांचा आरोप खोटा व दिशाभूल करणारा आहे. भाजपाची मातृसंस्था आरएसएसला संविधान, देशाचा तिरंगा झेंडा पहिल्यापासूनच मान्य नाही. संविधान बदलण्याची भाषा संघ परिवार व भाजपाचे नेतेच सातत्याने करत असतात. लोकसभा निवडणुका सुरु होताच अनंतकुमार हेगडे या भाजपा नेत्याने ४०० पार चे बहुमत आले की, संविधान बदलणार हे जाहीरपणे सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागारानेही संविधान बदलले पाहिजे असे स्पष्ट केले आहे, असे असताना संविधानावरुन काँग्रेसवरच आरोप करणे हे पंतप्रधान मोदी व भाजपाला शोभत नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली. 

१० वर्षात एससी, एसटी, आदिवासी समाजाचा विकास केला हा मोदींचा दावा खोटा आहे. मोदी सरकारने मागासवर्गीय समाजासाठी असलेल्या कल्याणकारी योजनांच्या बजेटमध्ये कपात केली. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. आदिवासी समाजाच्या महिलेला राष्ट्रपती केल्याचे सांगताना महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घटनापासून वंचित ठेवले. अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाच्या सोहळ्यापासून वंचित ठेवले, या शब्दांत नाना पटोलेंनी टीकास्त्र सोडले.

जनता पुन्हा भाजपा व एनडीएला मते कशाला देईल

मागील १० वर्षातील मोदी सरकारचा कारभार हा शेतकरी, कामगार, महिला, तरुणवर्ग यांना उद्ध्वस्थ करणारा ठरला आहे. देशात ४० वर्षातील सर्वात मोठी बेरोजगारी आहे, मोदी सरकारने नोकर भरती केली नाही तरुणांच्या हाताला काम नाही, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही आणि १० वर्ष हा तर ट्रेलर आहे असे म्हणतात, पण हा ट्रेलरच जनतेला देशोधडीला लावणारा असेल तर जनता पुन्हा भाजपा व एनडीएला मते कशाला देईल. १० वर्षातील मोदी सरकारच्या पापाची शिक्षा जनता या लोकसभा निवडणुकीत देऊन त्यांना घरी बसवेल, असा दावा नाना पटोलेंनी केला.

लोकसभेच्या निवडणुका सुरु झाल्या की समाजांची आठवण झाली का?

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणुका आल्या की दलित, आदिवासी, ओबीसी, गरिब लोकांची आठवण येते. १० वर्षात या समाजासाठी मोदी सरकारने काहीही केलेले नाही. १० वर्षात या समाज घटकांवर अनन्वित अत्याचार केले गेले. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण मोदी सरकारमुळेच गेले आहे. आदिवासींच्या जमिनी हिरावून घेऊन उद्योगपतींच्या घशात घातल्या, गरिबांना अधिक गरिब बनवले आणि लोकसभेच्या निवडणुका सुरु झाल्या की एससी, एसटी, आदिवासी समाजाची आठवण झाली का, अशी विचारणा नाना पटोलेंनी केली. 

दरम्यान, गरिब समाजाला विकासाचा लाभ पोहचला असता तर ८० कोटी जनतेला ५ किलो मोफत रोशन द्यावे लागले नसते. ५ किलो मोफत धान्य देऊन १० वर्ष एससी, एसटी, आदिवासी व गरिब लोकांची मोदी सरकारने महागाई करुन प्रचंड लुट केली, या समाजाला जगणे कठीण करुन ठेवले आहे. २० लाख रुपयांचा सूट, ३ लाखांचा चष्मा, १.५ लाखांचा पेन आणि ८ हजार कोटींचे विमान वापरणारे नरेंद्र मोदी गरिब कसे? हा प्रश्न देशातील गरीब जनतेला पडला आहे, अशी गरिबी या समाजाला का लाभली नाही? याचे उत्तर मोदींनी दिले पाहिजे, अशी मागणी नाना पटोलेंनी केली.

 

Web Title: nana patole replied bjp rss and pm narendra modi over criticism on congress in rally for lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.