तिढा सुटला, सामंतांनी दावा सोडला, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये महायुतीकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 11:23 AM2024-04-18T11:23:46+5:302024-04-18T11:45:02+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये सुरू असलेला तिढा अखेर सुटला आहे. येथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असलेले किरण सामंत यांनी दावेदारी माघार घेण्याचा निर्णय घेतला असून, आता भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024: Kiran Samant quits candidacy, Narayan Rane confirmed as candidate from Mahayuti in Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency | तिढा सुटला, सामंतांनी दावा सोडला, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये महायुतीकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर

तिढा सुटला, सामंतांनी दावा सोडला, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये महायुतीकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर

गेल्या अनेक दिवसांपासून कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये सुरू असलेला तिढा अखेर सुटला आहे. येथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी दावेदारी माघार घेण्याचा निर्णय घेतला असून, आता या मतदारसंघातून भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. नारायण राणे हे १९ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नारायण राणे हे महायुतीचे उमेदवार असलील, तसेच आम्ही पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या प्रचारामध्ये सहभागी होऊ, असे उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.   

सामंत बंधूंनी प्रसारमाध्यमांना संबोधित करत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावरील दावेदारी सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर भाजपाकडून मतदारसंघामधून उमेदवार म्हणून नारायण राणे यांच्या नावाची तातडीने घोषणा करण्यात आली आहे. नाराणय राणे यांनी राज्य सरकारमध्ये मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते केंद्रात मंत्री अशी अनेक पदे भूषवली आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली-मालवण आणि मालवण या विधानसभा मतदारसंघांचंही प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच त्यांना राज्यसभा सदस्य म्हणूनही काम पाहिलेलं आहे. मात्र लोकसभा निवडणूक लढवण्याची नारायण राणे यांची ही पहिलीच वेळ आहे.  

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरील दावेदारी सोडत असल्याचे सामंत बंधूंनी आज पत्रकार परिषद घेत जाहीर केले. यावेळी उदय सामंत म्हणाले की, ज्यावेळी आपण नेतृत्व मानतो. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासारखी व्यक्ती स्वत: हस्तक्षेप करते. मुख्यमंत्री काही सूचना करतात. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे पूर्वीपासूनचे सहकारी असलेली व्यक्ती काही गोष्टी सांगते, तेव्हा काही गोष्टींमध्ये चार पावलं मागे यावं, असं आम्ही चर्चा करून ठरवलं. पण चार पावलं मागे आलो, म्हणजे भविष्यात आपण काहीच करायचं असं होत नाही. आम्ही ज्या मुद्द्यांवर ठाम होतो, त्यावर आजही ठाम आहोत. किरण सामंत यांना आज ना उद्या खासदार करायचं हे निश्चित आहे. त्यामुळे आज जो काही तिढा निर्माण झाला होता, तो सोडवण्यासाठी किरण सामंत यांनी स्वत: पुढाकार घेतला, असे उदय सामंत यांनी सांगितले.

तसेच आम्ही काही काळ थांबवण्याचा निर्णय घेतला असला तरी उद्या उमेदवारी अर्ज दाखल करताना आम्ही संपूर्ण ताकदीनिशी नारायण राणे यांच्यासोबत उपस्थित राहणार आहोत. तसेच हा निर्णय घेतला म्हणजे आम्ही किंवा आमचं कुटुंब राजकारणातून थांबलो असा होत नाही, असे सूचक संकेतही उदय सामंत यांनी दिले.

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: Kiran Samant quits candidacy, Narayan Rane confirmed as candidate from Mahayuti in Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.