Loksabha Election 2024: १० एप्रिलला नरेंद्र मोदींची पहिली सभा; रामटेकमध्ये फुंकणार प्रचाराचं रणशिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 06:36 PM2024-04-02T18:36:15+5:302024-04-02T18:37:17+5:30

Loksabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या प्रचाराचा नारळ महाराष्ट्रातून फुटणार आहे. महायुतीच्या प्रचारासाठी मोदी १० एप्रिलला राज्यात येत आहे. त्याचसोबत भाजपाच्या इतर नेत्यांच्या सभेचेही नियोजन करण्यात आले आहे. 

Loksabha Election 2024: Narendra Modi's first Rally on April 10 at Ramtek, Maharashtra | Loksabha Election 2024: १० एप्रिलला नरेंद्र मोदींची पहिली सभा; रामटेकमध्ये फुंकणार प्रचाराचं रणशिंग

Loksabha Election 2024: १० एप्रिलला नरेंद्र मोदींची पहिली सभा; रामटेकमध्ये फुंकणार प्रचाराचं रणशिंग

मुंबई- Narendra Modi In Maharashtra ( Marathi News ) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातून प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. त्यांच्या प्रचाराचा झंझावात राज्यात दिसून येणार आहे. येत्या १० एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदीरामटेक येथे पहिली जाहीर सभा घेणार आहेत. त्यानंतर १४ एप्रिलला दीक्षाभूमी येथे दर्शन व चंद्रपूर येथे जाहीर सभा नियोजित आहे अशी माहिती भाजपा आमदार प्रविण दरेकर यांनी दिली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ५ किंवा ६ एप्रिल रोजी विदर्भात सभा होणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि शीर्षस्थ नेत्यांच्या सभांचेही वेळापत्रक लवकच जाहीर होईल असंही त्यांनी सांगितले.  

निवडणूक व्यवस्थापन समितीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर म्हणाले की, भाजपा हा पक्ष निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत नियोजनबद्ध,  कालबद्ध आणि समयसूचक काम करणारा पक्ष आहे. पक्षाची निवडणूक व्यवस्थापन समिती ही निवडणुकीत अत्यंत महत्वाची भूमिका निभावत असते. आज महाराष्ट्राच्या व्यवस्थापन समितीची बैठक प्रभारी डॉ. दिनेश शर्मा यांच्या उपस्थितीत पार पडली. महाराष्ट्रात निवडणुकीच्या दृष्टीने व्यूहरचना काय आहे, कशा प्रकारची व्यवस्था, यंत्रणा उभी आहे. या यंत्रणेची अंमलबजावणी नेमकी कशा पद्धतीने होतेय याचा आढावा आणि मार्गदर्शक सूचना डॉ. दिनेश शर्मा यांच्या माध्यमातून देण्यात आल्या. व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून एकेकावर जबाबदारी देण्यात आली आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेकजण इच्छुक असतात. काही जण उमेदवारी मिळाली नाही तरी पक्षाच्या विचाराशी एकनिष्ठ राहून काम करतात आणि एखाद्याला निवडणूकच लढवायची असेल तर इतर पक्षात जाण्याची भूमिका अनेक लोकं अनेक पक्षात घेताना दिसतात. तशी भूमिक उन्मेष पाटील यांची आहे का? हे लवकरच समजेल. ठाकरेंना दुसऱ्यांनी टाकलेलेच उचलावे लागणार आहे. स्वतःकडे उमेदवार नाहीत. जे चांगले उमेदवार होते ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. उबाठा सेनेच्या उमेदवारांवर नजर टाकली तर सर्व उमेदवार आयात करून निवडणुका लढवत आहेत. रिकाम्या जागा भरण्याचा उबाठा सेनेचा प्रयत्न असल्याची बोचरी टिका प्रविण दरेकरांनी केली.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची काल परभणी येथे सभा झाली. त्या सभेत सांगण्यात आले की कुणाचा बापही संविधान बदलणार नाही. एवढे संविधान आपले पवित्र, ताकदवान आहे. परंतु विरोधकांकडे निवडणुकीला मुद्देच राहिले नाहीत. मोदींच्या कर्तृत्वावर, विकासकामांवर, देशाच्या प्रगतीवर बोलण्यासाठी कुठलाही मुद्दा नाही. जनतेच्या प्रश्नाबाबत बोलत नाहीत. केवळ भावनिक वातावरण करता येते का? अशा प्रकारचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे असा टोला दरेकरांनी विरोधकांना लगावला. 

संविधानाची प्रतिष्ठा वाढविण्याचं काम केंद्रानं केलं
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा जाहीर सभेतून सांगितले आहे की, कुणाचा बाप आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार नाही. जी गोष्टच होणार नाही ती पुन्हा पुन्हा बोलायची, दूषित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा परंतु तो यशस्वी होणार नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाने संविधानाचा जेवढा सन्मान केलाय तेवढा आतापर्यंत कुणीही केला नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचा उदोउदो करण्याचे काम, संविधानाची प्रतिष्ठा आणखी वाढविण्याचे काम आमच्याच केंद्र सरकारने केलंय असं दरेकरांनी म्हटलं. 

Web Title: Loksabha Election 2024: Narendra Modi's first Rally on April 10 at Ramtek, Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.