राज्यसभेच्या रिक्त जागेवर मनसेला संधी?; 'मिशन ४५ प्लस'साठी भाजपाची रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 12:30 PM2024-03-25T12:30:41+5:302024-03-25T12:32:05+5:30

MNS in Mahayuti: मनसेचा खासदार राज्यसभेत जाणार असल्याचं बोललं जाते. परंतु अद्यापही मनसे-भाजपा या दोन्ही पक्षातील नेत्यांनी युतीबाबत ठोस भूमिका मांडली नाही.

Lok sabha Election 2024: A chance for MNS on Rajya Sabha vacant seat?; BJP's strategy for 'Mission 45 Plus' with Raj Thackeray | राज्यसभेच्या रिक्त जागेवर मनसेला संधी?; 'मिशन ४५ प्लस'साठी भाजपाची रणनीती

राज्यसभेच्या रिक्त जागेवर मनसेला संधी?; 'मिशन ४५ प्लस'साठी भाजपाची रणनीती

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपा-मनसे यांच्यात युतीची शक्यता वर्तवली जात आहे. मिशन ४५ प्लससाठी भाजपाने नव्या मित्रांना सोबत घेण्याची रणनीती आखली आहे. त्यात राज्यसभेच्या रिक्त जागेवर मनसेला संधी देण्याची चर्चा पुढे आली आहे. बाळा नांदगावकर, जे राज ठाकरेंसोबत मनसेच्या स्थापनेपासून आहेत त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकते. तर अमित ठाकरेंनाही राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर घेण्याची चर्चा सुरू आहे.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हे उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्यामुळे राज्यसभेची एक जागा रिक्त होईल. नुकतेच राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात दिल्लीत बैठक झाली. तेव्हापासून मनसे-भाजपा युतीच्या चर्चेला जोर आला. या बैठकीनंतर राज्यात राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही बैठक झाली. लोकसभेसाठी भाजपा मनसेला किती जागा देणार याबाबत ठोस माहिती नसली तरी अचानक घडणाऱ्या या घडामोडींमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत असं भाजपाच्या नेत्याने सांगितले. 

राज्यात मिशन ४५ प्लस यासाठी भाजपाला मनसेच्या पाठिंब्याचीही आवश्यकता आहे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत फूट पडली, ५५ पैकी ४४ आमदार शिंदेंसोबत आले. १३ खासदारही शिंदेंच्या गटात आहेत. मात्र शिंदेसोबत मतदार किती असावेत याबाबत अद्याप स्पष्टता नाही. शिंदेंसोबत आमदार, खासदार असले तरी मतदार उद्धव ठाकरेंसोबत असल्याची भीती भाजपा नेत्यांना वाटते. त्यामुळे मिशन ४५ प्लस हे महायुतीसाठी कठीण बनलं आहे. त्यात राज ठाकरे यांच्या मनसेने मागील लोकसभा निवडणूक लढली नाही. परंतु विधानसभा निवडणुका पाहिल्या तर केवळ मुंबईत त्यांच्याकडे ५ लाखाहून अधिक मतदार आहेत. 

दरम्यान, भाजपा-मनसे यांच्यातील युती ही जवळपास निश्चित आहे. परंतु मनसेला नेमकं युतीत किती जागा मिळणार, अथवा मिळणार नाहीत हे दोन्ही पक्षातील कुणीही अधिकृतरित्या स्पष्ट केले नाही. त्यामुळे या चर्चा आणि तर्कवितर्कांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.

Web Title: Lok sabha Election 2024: A chance for MNS on Rajya Sabha vacant seat?; BJP's strategy for 'Mission 45 Plus' with Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.