'मॅच फिक्सिंग'! 'सूरत'च्या जागेवरून राजकारण तापलं; जितेंद्र आव्हाडांचे टीकेचे बाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 08:09 PM2024-04-22T20:09:49+5:302024-04-22T20:12:18+5:30

सूरतची जागा भाजपने जिंकताच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सत्ताधारी भाजपला लक्ष्य करण्यास सुरुवात केली.

BJP candidate Mukesh Dalal has won unopposed from Surat in Gujarat and on this MLA Jitendra Awad has criticized the ruling BJP and the Election Commission | 'मॅच फिक्सिंग'! 'सूरत'च्या जागेवरून राजकारण तापलं; जितेंद्र आव्हाडांचे टीकेचे बाण

'मॅच फिक्सिंग'! 'सूरत'च्या जागेवरून राजकारण तापलं; जितेंद्र आव्हाडांचे टीकेचे बाण

गुजरातमधील सूरत या लोकसभेच्या जागेवर भाजपने बिनविरोध विजय मिळवताच राजकारण तापले आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सत्ताधारी भाजपला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सूरतच्या जागेचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. अशातच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मॅच फिक्सिंगचा आरोप करत भाजपवर सडकून टीका केली. इतर सर्व उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे सूरत येथून भाजप उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध विजयी झाले.

खरं तर  काँग्रेस उमेदवार नीलेश कुंभानी यांनी उच्च न्यायालयात याप्रकरणी धाव घेतली, मात्र अद्याप कोणतीही अपडेट समोर आली नाही. अशा स्थितीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्याने मुकेश दलाल विजयी झाले आहेत. यावरून आव्हाड यांनी संताप व्यक्त करत सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजप आणि निवडणूक आयोगावर टीकेचे बाण सोडले. 

ते म्हणाले की, लोकशाही कशी धोक्यात आहे याची क्रोनोलॉजी समजून घ्या... सूरतमध्ये काँग्रेसचे पहिले उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज रद्द करण्यात आला. त्यानंतर सूरतमधून काँग्रेसच्या दुसऱ्या पर्यायी उमेदवाराचा अर्ज फेटाळण्यात आला. यानंतर भाजप उमेदवार वगळता इतर सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. (की मागे घेण्यास भाग पाडले गेलं?) आणि मग सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांना 'बिनविरोध' विजयी घोषित करण्यात आले. निवडणूक आयोग वारंवार सांगतो की सर्वांना समान संधी आणि न्याय मिळाला पाहिजे, परंतु ते देखील सत्ताधाऱ्यांच्या हातातले बाहुले झाले आहेत. अन्यथा ही परिस्थिती उद्भवली नसती. 

तसेच हे 'मॅच फिक्सिंग' आहे, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत कारण सध्या ते बिथरले आहेत. दहा वर्ष सत्ता उपभोगल्यानंतरही त्यांच्याकडे मतदारांना सांगण्यासारखे काही नाही. भाजपच्या उमेदवारांचे तर काहीच कर्तृत्व नाही. मोदींकडे निवडणूक सभांमध्ये बोलण्यासाठी काही नाही म्हणून ते हिंदू-मुसलमान या मुद्याकडे वळले आहेत. उमेदवारी भरण्याच्या पातळीवरच सर्व यंत्रणा मॅनेज करूनच ही लोकं '४०० पार'चा नारा देत आहेत. म्हणून आम्ही वारंवार सांगतोय ही लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठीची निवडणूक आहे, अशा शब्दांत आव्हाड यांनी सरकारवर टीका केली.

Web Title: BJP candidate Mukesh Dalal has won unopposed from Surat in Gujarat and on this MLA Jitendra Awad has criticized the ruling BJP and the Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.