कसोटी क्रमवारीत टीम इंडियाचे अव्वलस्थान कायम, पण...

वार्षिक फेरबदलांनंतर आयसीसीने कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 संघांची सुधारित क्रमवारी प्रसिद्ध केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 05:13 PM2019-05-02T17:13:11+5:302019-05-02T17:14:46+5:30

whatsapp join usJoin us
Team India retains top position in ICC Test rankings | कसोटी क्रमवारीत टीम इंडियाचे अव्वलस्थान कायम, पण...

कसोटी क्रमवारीत टीम इंडियाचे अव्वलस्थान कायम, पण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दुबई - वार्षिक फेरबदलांनंतर आयसीसीने कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 संघांची सुधारित क्रमवारी प्रसिद्ध केली आहे. यापैकी कसोटी संघांच्या क्रमवारीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आपले अव्वलस्थान कायम राखले आहे. मात्र 2015-16 मधील मालिकांची कामगिरी वगळण्यात आल्याने भारताच्या गुणसंख्येत घट झाली आहे. त्यामुळे भारतीय संघ आणि दुसऱ्या क्रमांकावरील न्यूझीलंड यांच्यात केवळ दोन गुणांचे अंतर राहिले आहे. दरम्यान, एकदिवसीय क्रमवारीत इंग्लंडने अव्वलस्थान पटकावले आहे. तर भारतीय संघ दुसऱ्या स्थानी आहे.

क्रमवारीमधील वार्षिक फेरबदलांपूर्वी कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या भारताचे 116 गुण होते तर न्यूझीलंडच्या खात्यात 108 गुण जमा होते. मात्र फेरबदलांमध्ये 2015-16 ची आकडेवारी वगळण्यात आल्याने तसेच 2016-17 आणि 2017-18 मधील केवळ 50 टक्केच गुण सामावून घेण्यात आल्याने भारताच्या गुणसंख्येत 3 गुणांची घट झाली आहे. तर न्यूझीलंडच्या खात्यात अधिकचे तीन गुण जमा झाले आहेत. त्यामुळे आता भारतीय संघ 113 गुणांसह पहिल्या तर न्यूझीलंड 111 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.  या क्रमवारीत दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलियाला पाचव्या स्थानावर ढकलून इंग्लंडने चौथे स्थान पटकावले आहे. 

एकदिवसीय क्रमवारीत इंग्लंडने आपले अव्वलस्थान कायम राखले आहे. मात्र क्रिकेट विश्वचषकामध्ये अव्वलस्थानासह खेळण्यासाठी त्यांनी आयर्लंड आणि पाकिस्तानविरुद्धच्या मालिकांमध्ये विजय मिळवावा लागेल. आयर्लंडविरुद्ध 1-0 ने आणि पाकिस्तानविरुद्ध 3-2 ने विजय मिळवल्यास इंग्लंडचे अव्वलस्थान कायम राहील. या क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिका तिसऱ्या आणि न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आहे. तर वेस्ट इंडिजचा संघ श्रीलंकेला मागे टाकून सातव्या स्थानावर पोहोलचला आहे.  

Web Title: Team India retains top position in ICC Test rankings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.