ICC World Cup 2019: चूक ती चूकच; तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं धोनी!

क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेची हवी तशी वातावरण निर्मिती अद्याप झालेली दिसत नाही. भारताचा एक सामना झाला, तरीही हा निरुत्साह कायम दिसत आहे. म्हणून तर धोनीच्या ग्लोव्हजचा वाद तयार करण्यात आला तर नसावा ना?

By स्वदेश घाणेकर | Published: June 8, 2019 11:14 AM2019-06-08T11:14:41+5:302019-06-08T11:29:51+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: M.S. Dhoni, It was not expected from you! | ICC World Cup 2019: चूक ती चूकच; तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं धोनी!

ICC World Cup 2019: चूक ती चूकच; तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं धोनी!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- स्वदेश घाणेकर 

वर्ल्ड कप स्पर्धा एन रंगात आलेली असताना एका वादानं डोकं वर काढलं अन् त्या वादाच्या केंद्रस्थानी महेंद्रसिंग धोनी असल्यानं डोकं आणखीन तापलं. क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेची हवी तशी वातावरण निर्मिती अद्याप झालेली दिसत नाही. भारतीय संघाचा पहिला सामना हा आठवड्यानंतर होता म्हणून सुरुवातीचे सामने निरस वाटले. पण भारताचा एक सामना झाला, तरीही हा निरुत्साह कायम दिसत आहे. म्हणून तर धोनीच्या ग्लोव्हजचा वाद तयार करण्यात आला तर नसावा? धोनीला अशी काय गरज पडली की देशप्रेम व्यक्त करण्यासाठी त्याला ही कृती करावी लागली? आयसीसीचे नियम धोनीला/ बीसीसीआयला माहीत नसावे, असं होईल का? आणि आयसीसीच्या निर्णयानंतर नाचक्की कोणाची झाली, भारताची की धोनीची? भारतीय संघाचे लक्ष विचलित करण्याचा तर हा डाव नसावा ना? 

असे अनेक प्रश्न सध्य डोक्यात यॉर्कर टाकत आहेत... कोणाला चुकवायचे, कोणाला टोलवायचे काहीच सुचत नाही... अशी अवस्था सध्या भारतीय क्रिकेट चाहत्यांची आहे. धोनीनं त्याच्या विकेटकिपिंग ग्लोव्हजवर 'बलिदान बज' चिन्ह लावले आणि आयसीसीनं ताशेरे ओढले. आयसीसीचा हा पवित्रा म्हणजे कॅप्टन कूल धोनीच्या देशप्रेमाला जणू चॅलेंजच... मग काय, होऊ दे चर्चा. आयसीसी कसं सुडाचं राजकारण करतय इथपासून ते आयसीसीनं अक्कल गहाण टाकलीय, अगदी इथपर्यत चर्चा झाल्या. काही आजी- माजी खेळाडूंसह बीसीसीआय आणि प्रशासकीय समिती अध्यक्षांनी धोनीचे समर्थन केले. त्यांनी थेट आयसीसीला पत्र पाठवत धोनीला ते चिन्ह ग्लोव्हजवर ठेवण्याची मान्यता मिळावी यासाठी विनंती केली. झालं काय, तर आयसीसीनं नकार देत बीसीसीआयला चपराकच लगावली...

धोनीचा अपमाम सहन न करणारे भक्त आता भारतीय संघाने स्पर्धेवर बहिष्कार घालावा ही मागणी करू लागले आहेत. प्रसारमाध्यमंही क्रिकेटच्या मैदानावर सुरू असलेल्या चर्चेसाठी राजकीय प्रवक्त्यांना बोलावून या मुद्याला देशभक्तीचा रंग देऊ पाहत आहेत.  वर्ल्ड कप स्पर्धेसाठी लंडनमध्ये दाखल झालेल्या लाखभर भारतीयांनी तिकिटं फाडून आपला निषेध नोंदवावा, असही बोललं जात आहे. क्रिकेटवेड्या देशात आणखी काही दिवस असेच अकलेचे तारे तोडले जातील आणि रविवारी हीच लोकं समोर खाद्यपदार्थ आणि कोल्ड ड्रिंक्स ठेवून भारत ऑस्ट्रेलिया सामन्याचा आस्वाद घेताना दिसतील. असो तो त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे..  

आता खऱ्या मुद्याकडे येऊया.. 
२००७ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि २०११ च्या वन डे वर्ल्ड कप विजेत्या संघाचा कर्णधार; आयसीसीच्या सर्व प्रमुख स्पर्धा जिंकणारा एकमेव कर्णधार असलेल्या धोनीला आयसीसीच्या या नियमाचा विसर पडला कसा? धोनीनं भारतीय संघासाठी सर्वस्व दिलं म्हणून तर तो आज 130 कोटी भारतीयांच्या गळ्यातील ताईत आहे. त्याच्या प्रत्येक कृतीवर जगभरातील क्रिकेट चाहते लक्ष ठेऊन असतात. असं असताना त्याला देशप्रेम सिद्ध करण्यास कुणी सांगितले होते का, तर नाही. मग धोनीनं भावनेच्या भरात  ते चिन्ह ग्लोव्हजवर लावले असावे, असं आपण गृहित धरुया..

पण आयसीसीच्या नियमात हे बसत नाही समजल्यावर ते काढण्याचा शहाणपणा दाखवायचा सोडून आयसीसीकडे परवानगीसाठी पत्र पाठवण्याची गरज काय? आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत खेळाडूच्या किट संदर्भात एक नियमावली असते आणि त्याचे काटेकोरपणे पालन होते. कोणत्याहे खेळाडून आपल्या जर्सीवर वैयक्तिक संदेश देणारे किंवा राजकीय, जातीय संदेश देणारे चिन्ह न वापरण्याचा नियम आहे. धोनीने वापरलेले चिन्ह ना राजकीय होते ना धार्मिक... मग आयसीसीचा आक्षेप का व कशाला? हा प्रश्न मनात येणे साहजिकच आहे. 

आयसीसीच्या नियमानुसार यष्टीरक्षकाने त्याच्या ग्लोव्हजवर केवळ आणि केवळ उत्पाद कंपनीचा लोगो वापरणे गरजेचे आहे. इतकी वर्ष आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळणाऱ्या धोनीला हे नक्की माहित असेलच. त्यामुळे आयसीसीच्या निर्देशाचे पालन त्याच्याकडून व्हायलाच होते. हे सर्व अनावधानाने झाले असेल तर हा मुद्दा वाढवण्यापेक्षा चूक सुधारण्याचा मोठेपणा बीसीसीआयन दाखवायला हवा होता. त्यानं हा मुद्दा तापलाही नसता आणि प्रसारमाध्यमांना आपले डोकं नको तिथे चालवण्याची संधी मिळाली नसती..

पण बीसीसीआयनं तसं न केल्यानं आंतरराष्ट्रीय स्थरावर ना केवळ भारतीय संघाची तर धोनीची नामुष्की झाली आहे. या चुकांमधून पुढे जाणं गरजेचं आहे. तर आणि तरच मिशन वर्ल्ड कप यशस्वी होईल!

Web Title: ICC World Cup 2019: M.S. Dhoni, It was not expected from you!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.