मुनगंटीवार की धानोरकर; चंद्रपुरातील सामना जिंकणार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 12:42 PM2024-04-13T12:42:06+5:302024-04-13T12:42:17+5:30

वंचितच्या उमेदवाराचा प्रचार कोणाच्या पथ्यावर?

Mungantiwar or Dhanorkar; Who will win the match in Chandrapur? | मुनगंटीवार की धानोरकर; चंद्रपुरातील सामना जिंकणार कोण?

मुनगंटीवार की धानोरकर; चंद्रपुरातील सामना जिंकणार कोण?

राजेश भोजेकर
चंद्रपूर : देशाचे लक्ष लागून असलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. महायुतीकडून राज्याचे सांस्कृतिक कार्य, वने व मत्स्यव्यवसाय मंत्री व सुधीर मुनगंटीवार आणि दुसरीकडे   महाविकास आघाडीच्या उमेदवार काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात थेट आणि काट्याची लढत होईल, असे चित्र आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने जनतेचे लक्ष वेधून घेतले. याच सभेत मुनगंटीवारांनी भाऊ-बहिणीचा दाखला देत केलेले वक्तव्य त्यांच्याच अंगलट आले. काँग्रेसने याचा पूर्ण फायदा घेण्याचा प्रयत्न केला असला, तरी मोदींच्या सभेचा अंडरकरंट दृष्टिआड करता येणार नाही, असे चित्र आहे. 
मतदारसंघात १५ उमेदवार रिंगणात आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले प्रचारात फारसा प्रभाव पाडताना दिसत नाहीत. वंचितचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या दोन सभांचा किती प्रभाव पडतो, हे बघण्यासारखे आहे. २०१९ मध्ये वंचितचे ॲड. राजेंद्र महाडोळे यांनी १ लाख २० हजार मते घेतली होती. तुलनेत वंचितचे विद्यमान उमेदवार बेले एवढी मते घेतील, याबाबत साशंकता आहे. दुसरीकडे अनुसूचित जाती व मुस्लिम समाजाला वंचितकडून प्रतिनिधित्व मिळण्याची आशा होती.  ते न मिळाल्याने निर्माण झालेली नाराजी कोणाच्या पथ्थ्यावर पडते हे बघण्यासारखे आहे. 
भाजप विकासाचा दृष्टीकोन मांडत आहे तर काँग्रेस विकासाची हमी देत आहे. यामध्ये कोण मतदारांना भावते, हे पाहणे रंजक असेल. काँग्रेसकडून अद्याप स्टार नेत्यांची जाहीर सभा झाली नसली तरी अखेरच्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे.

२०१९ ची परिस्थिती दिसत नाही
२०१९ मध्ये काँग्रेसचे बाळू धानोरकर यांनी ४४ हजारांच्या मताधिक्याने ही जागा जिंकली होती. त्यावेळी हंसराज अहीरांबाबत अँटीइन्कमबन्सी होती. सुरूवातीला काँग्रेसने विनायक बांगडे यांना तिकीट दिल्याने धानोरकरांना सहानुभूती होती. यावेळी तशी सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न प्रतिभा धानेारकर करीत आहेत. त्यांनी आमदार म्हणून स्वतःला राजकारणात सिद्ध केले आहे. दमदार उमेदवार म्हणून त्यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे. दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली विकासकामे आणि त्यांची दूरदृष्टी ही बाब लक्ष्यवेधी ठरत आहे. जात फॅक्टरचा फायदा धानोरकर यांना होईल, ही बाब हेरून मुनगंटीवार यांनी कुणबी समाजासह अन्य समाजाला जवळ करण्याचा पुरेपूर प्रयत्न चालवला आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

देशात १० वर्षांत मोदी सरकार आणि चंद्रपुरात आधीची पाच वर्षे भाजपचे हंसराज अहीर आणि त्यानंतरची चार वर्ष काँग्रेसचे बाळू धानोरकर खासदार होते. या काळात केंद्राचा एकही लक्षवेधी प्रकल्प जिल्ह्यात आला नाही.
चंद्रपूर जिल्ह्यात सिंचनाचा अभाव आहे. शेतीवर एकही प्रक्रिया उद्योग नाही. उद्योगांचा जिल्हा असला तरीही स्थानिकांना रोजगार नाही. उलट प्रदूषणामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतोय. कोळखा खाणी व इतर प्रकल्पांमुळे बेघर झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अद्यापही रेंगाळत आहेत.

गटातटाचा काय
होणार परिणाम?
nकाँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या शिष्टाईने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे मनोमिलन झाल्याचे काँग्रेस गोटात बोलले जात होते. मात्र, चंद्रपुरातील
एका सभेनंतर वडेट्टीवार प्रचारात दिसले नाहीत. 
n२०१९ च्या पराभवातून हंसराज अहीर सावरलेले नाहीत. अप्रत्यक्षपणे ते मुनगंटीवार यांनी विरोधात काम केल्यामुळे भाजपाचा पराभव झाला, अशी खदखद नेहमी व्यक्त करतात. यावेळी अहीर प्रभावीपणे प्रचारात दिसत नाहीत.  

Web Title: Mungantiwar or Dhanorkar; Who will win the match in Chandrapur?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.