'माह्यावर लक्ष असू द्या जी'... वैशाली येडेंची साद, मतदार देईल का प्रतिसाद? 

By महेश गलांडे | Published: April 9, 2019 05:19 PM2019-04-09T17:19:54+5:302019-04-09T17:28:53+5:30

साधं मातीनं सारवलेलं घर, घरात थोडीशीच गरजेपुरती भांडीकुंडी, काळाची गरज म्हणून घेतलेला टीव्ही आणि आपल्या दोन मुलांसह वैशाली आपल्या कळंब तालुक्यातील राजूर गावातील अतिसामान्य कुटुंबात राहते.

Vaishali Yade contestant of yavatmal washim lok sabha constituency against bhavna gavali | 'माह्यावर लक्ष असू द्या जी'... वैशाली येडेंची साद, मतदार देईल का प्रतिसाद? 

'माह्यावर लक्ष असू द्या जी'... वैशाली येडेंची साद, मतदार देईल का प्रतिसाद? 

Next

वैशालीताईंकडे पाहिल्यानंतर कुणीही म्हणेल, किती साधी बाई आहे ही.... होय, साधी अन् गरीब घरची लेक आहे वैशाली येडे. एका आत्महत्याग्रस्त कर्जबाजारी शेतकरी कुटुंबातील विधवा. पण, परिस्थितीशी दोन हात करत हीच शेतकऱ्याची विधवा बड्या आणि मातब्बर राजकारण्यांच्या विरोधात राजकीय मैदानात उतरली आहे. ना पैसा न अडका, ना सोनं ना नाणं, ना बाप राजकारणात किंवा सासरा पुढारी.. तरीही या लोकसभेच्या लढाईत वैशालीताई जोमानं उतरलीय. तिच्या या धाडसाचं करावं तेवढं कौतुक थोडंच! 'माह्यावर लक्ष असू द्या जी' म्हणत यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दुष्टचक्रातून सोडवण्यासाठी वैशाली मतांचा जोगवा मागत आहेत. आता, वैशालीताईंच्या या हाकेला शेतकरी मतदार साथ देतो का, हे पाहावं लागेल. 

यवतमाळ-वाशिम मतदारसंघात एकूण 17.5 लाख मतदार असून 11 एप्रिल रोजी या मतदारसंघात मतदान होत आहे. वैशालीताईंना या मतदारसंघात विद्यमान खासदार आणि दिग्गज राजकारणी भावना गवळी यांच्या बलाढ्य लढतीचे आव्हान आहे. साधं मातीनं सारवलेलं घर, घरात थोडीशीच गरजेपुरती भांडीकुंडी, काळाची गरज म्हणून घेतलेला टीव्ही आणि आपल्या दोन मुलांसह वैशाली आपल्या कळंब तालुक्यातील राजूर गावातील अतिसामान्य कुटुंबात राहते. नवऱ्यानं आत्महत्येचा मार्ग पत्करल्यानंतर सासू सासरेच तिचा आधार बनले आहेत. तर, पाठिराखा भाऊही आपल्या बहिणीसाठी सदैव तत्पर असतो. तरीही स्वाभिमानाची शिदोरी जपणारी ही माऊली सकाळी आपल्या शेतात मजुरी करते आणि दुपारी अंगणवाडीत मदतनीस म्हणून काम करते. पण, आज ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंच्या सहकारी असलेल्या दिग्गज खासदार भावना गवळींविरोधात त्यांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. नेहमीच शेतकरी, शेतकरी आत्महत्या आणि बळीराजा म्हणून भावनिक होणाऱ्या लोकांच्या विश्वासावर वैशाली या दिग्गज राजकारण्यांच्या विरोधात लढा देत आहेत. आपल्या प्रचारखर्चासाठी लोकांपुढे पदर पसरत आहेत, तर चक्क बसमधून गावोगावी हिंडून लोकांपर्यंत पोहोचत आहेत. राज्यासह देशात वैशालीताईंच्या उमेदवारीची चर्चा होत आहे.  

दिग्गज प्रस्थापित राजकारण्यांना विरोध

राजकीय आघाड्यात काँग्रेसकडून मातब्बर नेते आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे उमेदवार आहेत. तर, चारवेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी या शिवसेनेकडून वैशाली येडेंच्या विरोधात उभ्या आहेत. राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना ही महिला केवळ आपल्या शेतकरी नवऱ्याचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिग्गजांचा 'सामना' करत आहे. अर्थात, राजकारणाची एबीसीडीही वैशाली किंवा त्यांच्या कुटुंबाला माहीत नाही, तरीही त्या जोमाने टक्कर देत आहे. प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या पक्षाकडून शेतकऱ्यांच्या विश्वासावर त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. 

यवतमाळ येथील साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून मान

गेल्या वर्षीच यवतमाळ येथे झालेल्या साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्षपदावरून वाद झाल्यानंतर वैशालीताई यांना संमेलनाच्या उद्घाटक म्हणून संधी मिळाली आणि त्यांनी या संधीचं सोनं केलं. आपल्या भाषणात शेतकरी आत्महत्येचा प्रश्न व त्यांचे दुःख त्यांनी अवघ्या देशासमोर मांडले. तेव्हापासून त्या चर्चेत आल्या होत्या. हे भाषण नक्कीच ऐकावे असे आहे. सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे.

जातीय समीकरण 

वैशाली या खैरे कुणबी जातीच्या असून यवतमाळ जिल्ह्यात हा समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे समाजाचा संपूर्ण पाठिंबा मिळाल्यास वैशालीताईंची उमेदवारी दिग्गजांसाठी डोकेदुखी ठरेल, असेच दिसते. त्यामुळेच, पैसा किंवा कुठलीही पॉवर नसताना ही माऊली केवळ शेतकऱ्यांच्या विश्वासावर हा लढा लढत आहे. मत आणि दान यांची सांगड घालत मला विजयी करा, अशी भावनिक हाक वैशालीताई देत आहेत. 

यवतमाळ वाशिम मतदारसंघाबद्दल...

यवतमाळ-वाशिम हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात शेतीसाठी पाणी हा ज्वलंत प्रश्न आहे. कर्जबाजारीपणा, नापिकी, मंदावलेली ग्रामीण अर्थव्यवस्था या आणि शेतीशी संबंधित अशा अनेक समस्यांमुळे इथे शेकडो कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं आहे. शिवसेनेच्या भावना गवळी या गेली 4 टर्म येथून खासदार बनल्या आहेत. मात्र, अद्यापही मतदारसंघातील प्रश्न 'जैसे थे'च अशीच परिस्थिती आहे. प्रस्थापित राजकारण्यांनी मोठी स्वप्नं दाखवली, पण प्रत्यक्षात काम काहीच झालं नाही, असा इथल्या मतदारांचं म्हणणं आहे. त्यामुळे सहानुभूती आणि गरिबांच्या प्रश्नाची जाण या मुद्द्यांचा वैशाली येडेंना फायदा होऊ शकतो.

शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या

यवतमाळमधील 'कारंजा' ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ होती. कापूस, धान, सोयाबिन याची येथून आंतरराष्ट्रीय पातळीवर उलाढाल होत होती. कारंजा व यवतमाळ येथे इतकी समृद्धी होती की यवतमाळकरांनी 1634 कोटी रुपयांचे कर्ज इंग्रजांना दिले होते. मात्र, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे येथील परिस्थिती बदलत गेली आणि यवतमाळला आत्महत्यांचे ग्रहण लागले. यवतमाळ हा देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेला जिल्हा आहे, हे खेदाने नमूद करावे लागेल. हजारो महिलांच्या नशिबी वैधव्याचं जगणं आलं आहे. पिकाला भाव नाही, बाजारपेठ नाही, नापिकी यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. हे चित्र आपल्याला बदलायचे आहे. देशभरातील शेतकऱ्यांना पुन्हा नवा जगण्याचा नवा आत्मविश्वास देत त्यांना सन्मानाने उभे करायचे आहे, अशी खूणगाठ वैशाली येडेंनी बांधलीय.

शेतकऱ्यांचा कळवळा दाखवणारे स्वीकारणार?

शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्यांचा कळवळा नेहमीच राजकीय पक्षांकडून दाखविला जातो. मात्र, निवडणुका लागल्या की उमेदवारी ही केवळ पक्षातील नेते आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांबद्दलची आस्था हे राजकीय नेत्यांचे केवळ ढोंग असते हे अनेकदा दिसून येते. याउलट बच्चू कडू यांनी विधवा शेतकरी महिलेला उमेदवारी देऊन एक नवा अध्याय लिहिला आहे. मात्र, राजकीय नेत्यांप्रमाणेच मतदारसंघातील सामान्य जनताही येडेताईंना स्वीकारणार का? हा खरा प्रश्न आहे. 

शेतीसाठी बँकेचे घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पैसे नाहीत म्हणून वैशालीताईंच्या पतीने आत्महत्या केली होती. मात्र, पतीच्या निधनानंतरही खचून न जाता त्यांनी आपल्या दोन मुलांचे शिक्षण, घर आणि शेती सुरू ठेवली. पतीच्या निधनानंतर वैशालीताईंनी 'एकल महिला संघटन' उभे केले आणि आत्महत्या केलेल्या कुटुंबांना सावरत त्यांना आधार देण्याचे काम केले. या एकल महिलांना आत्मसन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न वैशालीताईंकडून सुरू आहे. यातून वैशालीताईंना लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. आता विज

Web Title: Vaishali Yade contestant of yavatmal washim lok sabha constituency against bhavna gavali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.