दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या; एक जागीच ठार, दुसरा गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2022 17:03 IST2022-05-21T16:59:43+5:302022-05-21T17:03:46+5:30
दिग्रस ते पुसद महामार्गावर सिंगद बसस्थानकापासून जवळच असलेल्या भिलवाडी-वडद फाट्याजवळ हा अपघात घडला.

दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या; एक जागीच ठार, दुसरा गंभीर जखमी
सिंगद (यवतमाळ) : दिग्रस तालुक्यातील सिंगदनजीक भिलवाडी-वडद फाट्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात एकजण जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
आकाश हरिदास राठोड (५०, रा. पोहरादेवी, ता. मानोरा, जि. वाशिम) असे मृताचे नाव आहे. दिग्रस ते पुसद महामार्गावर सिंगद बसस्थानकापासून जवळच असलेल्या भिलवाडी-वडद फाट्याजवळ हा अपघात घडला. दिग्रस येथून आकाश राठोड आपल्या दुचाकीने (क्र. एमएच ३७-पी ९२०१) जात असताना विरुद्ध दिशेने पुसद येथून शंकर उत्तम राठोड (३५, रा. मोप, ता. पुसद) आपल्या दुचाकीने (क्र. एमएच २९-एएक्स ८६८८) येत होते. दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली.
या अपघातात आकाश राठोड यांचा जागीच मृत्यू झाला, तर शंकर राठोड गंभीर जखमी झाले. मृतक आकाश राठोड हे ज्योतिबानगर (ता. मानोरा, जि. वाशिम) येथे मुख्याध्यापक होते. ते पोहरादेवी (ता. मानोरा) येथील मूळ रहिवासी होत. ते सध्या दिग्रस येथील पडगीलवार ले-आऊटमध्ये वास्तव्यास होते. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी शंकर राठोड यांना तातडीने दिग्रसच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी त्यांना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले. मृतक आकाश राठोड यांच्या मृतदेहाचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.