लॉकडाऊनमध्येही दारुविक्री, एसडीओंची मध्यरात्री धाड, चौघांना अटक तिघे फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 15:35 IST2020-04-22T15:34:48+5:302020-04-22T15:35:47+5:30
चौघांना अटक : तिघे फरार, लॉकडाऊनमध्ये दारू पुरवठ्याचा प्रयत्न

लॉकडाऊनमध्येही दारुविक्री, एसडीओंची मध्यरात्री धाड, चौघांना अटक तिघे फरार
पुसद (यवतमाळ) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदी असताना मध्यरात्री परवाना प्राप्त दुकानातील दारू काढण्याचा प्रयत्न येथील उपविभागीय दंडाधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांनी रात्री हाणून पाडला. डॉ. राठोड यांच्या नेतृत्वात पोलिसांनी धाड घातली. तेव्हा आतील चौघांना अटक करण्यात आली असून तिघे पसार होण्यात यशस्वी झाले.
उदय जगदेवप्रसाद मिश्रा (३५) रा. ग्रीनपार्क, रहेमान खान इब्राहीम खान (५५), गढीवार्ड, फिरोज खॉ रहेमान खॉ रा. गढीवार्ड सर्व पुसद, बंडू काळूराम वारंगे (३७) रा. हिवरासंगम ता. महागाव अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. त्यांचे दुकानाबाहेर पाळतीसाठी उभे असलेले तीन साथीदार पोलिसांना पाहताच पसार होण्यात यशस्वी झाले. पुसदमधील दिग्रस रोडवर छत्रपती शिवाजी चौकात तिरुपती ट्रेडर्स हे देशी दारूचे परवानाप्राप्त दुकान आहे. लॉकडाऊन असल्याने सर्वत्र दारू विक्री बंद आहे. त्यामुळे उपलब्ध दारू दुप्पट-तिप्पट दराने विकली जाते. हीच संधी साधून मंगळवारी रात्री १ वाजताच्या सुमारास तिरुपती ट्रेडर्समध्ये काही लोक दारूचा साठा घेऊन इतरत्र पोहोचविण्यासाठी प्रयत्नरत असल्याची टीप पुसदचे एसडीओ डॉ. व्यंकट राठोड यांना मिळाली. यावरून त्यांनी पुसद शहरचे ठाणेदार प्रमेश आत्राम, वसंतनगरचे ठाणेदार प्रदीपसिंह परदेशी व एक्साईजच्या पथकाला घेऊन धाड घातली. तेव्हा आतमध्ये चार जण दारूचा साठा काढून बाहेर नेण्याच्या प्रयत्नात असल्याचे आढळून आले. त्यांना अटक करण्यात आली आहे. सुमारे दीड लाखांचा माल बाहेर काढण्याचा त्यांचा प्रयत्न होता. वृत्तलिहिस्तोवर गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू होती. एक्साईज विभागही या प्रकरणात स्वतंत्र कार्यवाही करणार आहे.
बॉक्स
परवाना रद्दचा प्रस्ताव
दंडाधिकाºयांचे आदेश धुडकावून संचारबंदीत दारू विकण्याचा प्रयत्न करणाºया तिरुपती ट्रेडर्सचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा, असा प्रस्ताव जिल्हा दंडाधिकाºयांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती एसडीओ डॉ. व्यंकट राठोड यांनी ‘लोकमत’ला दिली.