Insurgency in the BJP, the headache of the Shiv Sena! | बंडखोरी भाजपमध्ये, डोकेदुखी शिवसेनेला!

बंडखोरी भाजपमध्ये, डोकेदुखी शिवसेनेला!

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व शिवसेना यांच्यात थेट सामना आहे. शिवसेनेला मात्र भाजपच्या बंडखोरीचा मोठा फटका बसण्याची चिन्हे आहे. याच वेळी या दोन्ही प्रमुख उमेदवारांमध्ये आपल्या समाजाची मते विभागली जाणार आहे. या मतदारसंघात २४ उमेदवार रिंगणात आहे. शिवसेनेच्या भावनाताई गवळी पाचव्यांदा रिंगणात आहेत. तर माणिकराव ठाकरे १५ वर्षानंतर पुढच्या दाराने निवडणूक लढवित आहेत. काँग्रेस त्यांना नवा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करीत आहे. मात्र माणिकरावांनी जिल्ह्याच्या राजकारणात गटबाजीला खतपाणी घातले, पक्ष वाढविला नाही, जिल्ह्याला काहीच दिले नाही असा आरोपही होत आहे.

सलग चार टर्म झाल्यामुळे भावना गवळी यांच्या विरोधात वातावरण आहे. त्यांच्या नावाला सुरुवातीपासूनच विरोध झाला. भाजपच नव्हे तर सेनेतील नेत्यांनीही हा विरोध रेटला. खुद्द मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात मध्यस्थी करावी लागली. आजही युतीतील प्रमुख नेते भावनातार्इंच्या विरोधात आहेत. त्यामुळे तार्इंना त्यांची मनधरणी करावी लागत आहे. ही नाराज नेते मंडळी भाजपचे बंडखोर पी.बी. आडे यांना ताकद देत आहे. बंजारा समाजाच्या मतांवर या बंडखोराची मदार आहे. मात्र या अपक्षाची बंडखोरी शिवसेनेसाठी अधिक नुकसानकारक ठरणारी आहे. काँग्रेस व शिवसेनेने एकाच समाजाचे दोन उमेदवार दिल्याने मतांचे विभाजन निश्चित आहे. आतापर्यंत तार्इंसोबत दिसणारा कुणबी समाज या वेळी पर्यायाचा विचार करतो आहे. दीर्घ अनुभवी राजकारणी व चार टर्मच्या खासदार असा दिग्गजांचा सामना येथे रंगतो आहे. माणिकरावांपुढेही पक्षांतर्गत गटबाजी थोपविण्याचे मोठे आव्हान आहे. राष्ट्रवादीतीलही एक गट माणिकरावांच्या विरोधात आहे. काँग्रेसची मदार परंपरागत मतदारांवर आहे. तर शिवसेनेला हिंदुत्व व मोदींना मानणाऱ्या मतदारांची मोठी मदत होणार आहे. या मतदारसंघात भाजपच्या बंडखोराला समाज बांधवांची मोठी ताकद मिळाल्यास काँग्रेसचा सामना या बंडखोरासोबत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वंचित आघाडीचा उमेदवार बंजारा समाजाची मते खेचू शकतो. 


काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गरिबांना वार्षिक ७२ हजार रुपये देण्याची केलेली घोषणा नागरिकांना मनापासून आवडली आहे. त्याच वेळी मोदी व भाजपा सरकारची केवळ आश्वासने आता जनतेने चांगलीच ओळखली आहे. त्यामुळे मतदार यावेळी भाजपाला नाकारुन काँग्रेसला पसंती देईल.
- माणिकराव ठाकरे, काँग्रेस

मी २० वर्षे खासदार असली तरी माझ्याविरोधात कोणताही फॅक्टर नाही. केंद्राचा विकास निधी मोठ्या प्रमाणात आणण्यावर माझा भर राहिला आहे. रेल्वे प्रकल्पांवर माझा सर्वाधिक जोर राहिला. माझा हा विकासच मला या निवडणुकीत पाचव्यांदा निवडून आणण्यास महत्वपूर्ण ठरणार आहे.
- भावना गवळी, शिवसेना

Web Title: Insurgency in the BJP, the headache of the Shiv Sena!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.