Prakash Dahakine has changed the political party four times for candidacy | प्रकाश डहाकेंनी उमेदवारीसाठी चार वेळा बदलले राजकीय पक्ष
प्रकाश डहाकेंनी उमेदवारीसाठी चार वेळा बदलले राजकीय पक्ष

- नंदकिशोर नारे  
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सत्तेत स्थान मिळावे, यासाठी कोण काय करेल सांगता येत नाही. कारंजा विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून आपल्याला स्थान मिळावे यासाठी, १९९५ ते २०१९ पर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश डहाके यांनी सलग; पण प्रत्येकवेळी वेगवेगळया राजकीय पक्षांकडून निवडणूक लढविली. यात त्यांना यश मात्र केवळ एकदाच (सन २००९) प्राप्त झाले.
कारंजा विधानसभा मतदारसंघामध्ये २०१९ च्या निवडणुकीकरिता १५ उमदेवार रिंगणात आहेत. यामध्ये विविध पक्ष व अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. अनेक दिग्गज नेतेही या निवडणुकीत आपले भाग्य आजमवतांना दिसून येत आहेत. प्रमुख पक्षाच्या उमेदवारांमध्ये भाजपाचे राजेंद्र पाटणी, राष्टÑवादी काँग्रेसचे प्रकाश डहाके, वंचितचे राम चव्हाण , बसपाचे युसूफ पुंजाणी यांचा समावेश आहे. यामध्ये १९९५ पासून विधानसभा निवडणूक लढविणारे प्रकाश डहाके यांनी लढविलेल्या निवडणुकीमध्ये विविध पक्षासोबत राहून निवडणूक लढविली. गत निवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेसच्यावतिने उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. येत्या निवडणुकीसाठी काही महिन्यांआधिच फिल्डींग लावून तयारी दर्शविली होती. शिवसेनेत प्रवेश करुन कारंजा मतदारसंघामधून निवडणूक लढविण्याच्या त्यांच्या मनसुब्यावर भाजपाला मतदारसंघ सुटल्याने पाणी फेरल्या गेले. आता आपण काय करावे , ताबडतोब त्यांनी राष्टÑवादी काँग्रेस पक्षाशी संपर्क करुन उमेदवारी मिळवून घेतली. प्रकाश डहाके यांनी १९९५ मध्ये काँग्रेस पक्षावर निवडणूक लढविली होती. यावेळी अपक्ष उमेदवार बाबासाहेब धाबेकर यांनी विजय मिळविला होता. २००४ मध्ये भारिप-बमसं या पक्षावर निवडणूक लढविली होती यावेळी शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र पाटणी यांनी त्यांचा पराभव केला होता तर २००९ मध्ये राष्टÑवादी काँग्रेस पक्षावर निवडणूक लढवून यामध्ये त्यांनी विजय संपादन केला होता. २०१४ मध्ये मात्र राष्टÑवादी काँग्रेसच्यावतिने राष्टÑवादी काँग्रेसने उमेदवारी न दिल्याने त्यांनी पक्षाशी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढविली होती. त्यात अपयश न आल्याने व पक्ष असल्याशिवाय विजय मिळत नाही याची कल्पना आल्याने त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारी म्हणून खा. भावना गवळी यांच्या संपर्कात राहून शिवसेनेमध्ये प्रवेश करुन घेतला. युतीमध्ये कारंजा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळेल व आपण निवडणूक लढवू असा अंदाज बांधला. परंतु उलटे होवून तेथील उमेदवारी भाजपाला मिळाल्याने बैचेन होवून आता काय करावे तर आपल्या जुन्याच पक्षाचा दरवाजा ठोठावून राष्टÑवादी काँग्रेसची उमेदवारी मिळविली. १९९५ ते २०१४ या दरम्यान झालेल्या चार विधानसभा निवडणुकीमध्ये प्रकाश डहाके यांनी वेगवेगळया पक्षावर निवडणूक लढवून राजकारणात आपले स्थान टिकविण्याचा प्रयत्न केला आहे.


मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये १२ वर्षे प्रामाणिकपणे होतो. त्यानंतर मी शिवसेनेत तीन वर्ष कार्यरत होतो. माझ्या कार्यामुळे राष्ट्रवादी व सेनाही मोठी झाली. त्या पक्षासोबत असणारे कार्यकर्ते सर्व आज माझ्यासोबत आहेत. त्यात काही भारीपचे कार्यकते सुद्धा आहेत. त्यामुळे माझ्या सोबत असलेले सर्व कार्यकर्ते म्हणजे दांडा आहे.,म्हणूनच मी जो ‘झेंडा’ हाती घेतला तो मजबूत आहे.
- प्रकाश डहाके
उमेदवार, राष्टÑवादी काँग्रेस पक्ष

Web Title: Prakash Dahakine has changed the political party four times for candidacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.