पश्चिम वऱ्हाडातील ७२० गावांमध्ये ‘एक गाव - एक गणपती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 16:00 IST2019-09-03T16:00:17+5:302019-09-03T16:00:52+5:30
७२० गावांनी ‘एक गाव-एक गणपती’ ही संकल्पना साकारत सामाजिक एकतेचा संदेश दिला.

पश्चिम वऱ्हाडातील ७२० गावांमध्ये ‘एक गाव - एक गणपती’
वाशिम - महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत पश्चिम वºहाडातील ७२० गावांनी ‘एक गाव-एक गणपती’ ही संकल्पना साकारत सामाजिक एकतेचा संदेश दिला.
गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिने पोलीस दलावर मोठा ताण असतो. बदलत्या काळानुसार गणेशोत्सवाचे स्वरुपही बदलत आहे. काही गावांत आपसी वाद, गटतट व स्पर्धेतून वादही निर्माण होण्याची शक्यता बळावते. गणेशोत्सवादरम्यान गावातील सामाजिक सलोखा, सद्भावना वाढीस लावणे आणि गावाची शांततेतून समृद्धीकडे वाटचाल ठेवण्यासाठी सन २००७ पासून राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत ‘एक गाव-एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यासंदर्भात पोलीस व महसूल विभागातर्फे गावकऱ्यांना आवाहन केले होते. या आवाहनाला पश्चिम वºहाडातील जवळपास ७०० गावांनी प्रतिसाद देत ‘एक गाव-एक गणपती’ हा उपक्रम प्रत्यक्षात साकारला आहे. वाशिम जिल्ह्यात २१०, बुलडाणा जिल्ह्यात २५३, अकोला जिल्ह्यात जवळपास २३५ अशा गावांत ‘एक गाव-एक गणपती’ या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा वाढीस लागण्याबरोबरच बेटी बचाओ-बेटी पढाओ, स्वच्छ भारत मिशन, दारूबंदी, स्त्रीभ्रूण हत्या, महिला सक्षमीकरण यासह समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यावर भर दिला जाणार आहे. विविध उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक समतेचा संदेश दिला जाणार आहे.