वाशिम जिल्हयात सर्वात मोठी श्रींची मूर्ती असलेले हेमाडपंती मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 16:22 IST2020-08-29T16:13:24+5:302020-08-29T16:22:27+5:30
दगडात कोरलेली श्रींची रेखीव मुर्ती व हेमांडपंथी असलेले हे मंदिर भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून जिल्हयात प्रसिध्द आहे.

वाशिम जिल्हयात सर्वात मोठी श्रींची मूर्ती असलेले हेमाडपंती मंदिर
- नंदकिशोर नारे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अकराव्या शतकात स्थापन करण्यात आलेले जिल्हयातील सर्वात मोठी श्रींची मुर्ती असलेले मंदिर रिसोड तालुक्यातील व्याड येथे दिसून येते. दगडात कोरलेली श्रींची रेखीव मुर्ती व हेमांडपंथी असलेले हे मंदिर भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून जिल्हयात प्रसिध्द आहे.
अकराव्या शतकात महाराष्टÑात मध्यवर्ती सत्ता असलेल्या यादवांचा प्रधान असलेला हेमाद्री नावाचा एक अंत्यत हुशार तथा वास्तुकला विशारद असा एक व्यक्ती होता . त्याने विकसित केलेली एक स्थापत्यशास्त्र त्यातून मन्दिर निर्मिती केली गेली ती सर्व मन्दिर ही हेमाडपंथी मंदीर मानली जातात . रिसोड तालुक्यातील व्याड (चिखली) येथे असेच एक हेमाडपंथी मंदिर आहे . ह्या मंदिराला कुठेही सिमेंट किंवा चुना वापरलेला नाही . खूप मोठ्या कोरलेल्या दगडी शिळा एकमेकांवर ठेऊन हे मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरात ४ फूट उंचीची श्री गणेशाची मूर्ती असून एवढी मोठी मूर्ती वाशिम जिल्ह्यात कुठेही नसल्याचे भाविक सांगतात.
सध्या या मंदिराचे व्यवस्थापन गावातील सर्व तरुण वर्ग करतो, यामध्ये प्रामुख्याने सुहास बोंडे, नारायण पवार , विजय दहिरे , ज्ञानेश्वर बोंडे आदिंचा समावेश आहे. यावर्षी कोरोनामुळे गणेशोत्सवात येथे गर्दी दिसून येत नसली तरी दररोज सकाळ, संध्याकाळची आरती करण्यात येत आहे. सद्यस्थितीत या गावासह परिसरातीलच नागरिक येथे दर्शनासाठी येतांना दिसून येत आहेत.