वसई, विरारमध्ये भाजपत वाहताहेत असंतोषाचे वारे; ‘बविआ’तून आलेल्यांना तिकीट देण्यास विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 09:33 IST2025-12-24T09:32:55+5:302025-12-24T09:33:14+5:30
एक वर्षापूर्वी शहरात भाजपचा आमदार निवडून आल्यानंतर संघटन मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम झाले.

वसई, विरारमध्ये भाजपत वाहताहेत असंतोषाचे वारे; ‘बविआ’तून आलेल्यांना तिकीट देण्यास विरोध
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई/विरार : वसई विरार शहरातील भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात ‘इनकमिंग’ तर बहुजन विकास आघाडीतून ‘आऊटगोइंग’ सुरू झाले आहे. बविआमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांना भाजपने उमेदवारी देऊ नये, अशी मागणी निष्ठावंत व जुन्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
एक वर्षापूर्वी शहरात भाजपचा आमदार निवडून आल्यानंतर संघटन मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम झाले. त्याच पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीची घोषणा होताच बविआतील अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केले. यामुळे बविआमध्ये फूट पडल्याचे चित्र, तर भाजपमध्ये इच्छुकांची रांग वाढत असल्याचे दिसते. भाजपकडून उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया सुरू असताना बविआमधून आलेले माजी नगरसेवकही तिकिटासाठी इच्छुक असल्याने ते मुलाखतीत दिसत आहेत.
संधी कोणाला मिळणार ?
लोकसभा व विधानसभा निवडणुकांत भाजपला विजय मिळवून देण्यासाठी मेहनत घेतलेल्या जुन्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये, अशी मागणी कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेतृत्वाकडे केल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, त्यांच्या या भूमिकेनंतर बविआमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांना संधी दिली जाणार की निष्ठावंत जुन्या कार्यकर्त्यांना उमेदवारीमध्ये प्राधान्य मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.