जागावाटपासह उमेदवारी याद्या गुलदस्त्यात; बैठका, घडामोडींवर लक्ष, सर्व पक्षांना बंडखोरीची भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 07:56 IST2025-12-29T07:56:40+5:302025-12-29T07:56:40+5:30
शेवटच्या दिवशी सर्वच जण अर्ज भरण्याची शक्यता असल्याने प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांवर ताण येण्याची शक्यता आहे.

जागावाटपासह उमेदवारी याद्या गुलदस्त्यात; बैठका, घडामोडींवर लक्ष, सर्व पक्षांना बंडखोरीची भीती
लोकमत न्यूज नेटवर्क, मिरा रोड / वसई : वसई-विरार पालिकेसह मीरा-भाईंदर पालिकेसाठी गेल्या चार दिवसांत हजारो अर्जाची विक्री झाली आहे. मात्र, आतापर्यंत अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके उमेदवारी अर्ज दाखल झालेत. अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोन दिवस उरलेले असतानाही दोन्ही पालिकांत कोणत्याच पक्षांचे जागावाटप ठरलेले नाही. त्यामुळे त्यांच्या उमेदवारी याद्याही शेवटच्या दोन दिवसांत जाहीर होऊन शेवटच्याच दिवशी अर्ज भरले जाण्याची शक्यता आहे. मुळात बंडखोरी टाळण्यासाठी सर्व पक्षीयांनी हा निर्णय घेतलेला आहे.
शेवटच्या दिवशी सर्वच जण अर्ज भरण्याची शक्यता असल्याने प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांवर ताण येण्याची शक्यता आहे.
सर्व पक्षांना बंडखोरीची भीती
वसई-विरार निवडणुकीसाठी महायुती जाहीर झाली असली तरी अद्याप त्यांचे जागावाटप नक्की झालेले नाही. दुसरीकडे बविआसोबत मविआने एकत्र लढण्याचे जाहीर केले होते, मात्र त्यातही कमी जागा मिळत असल्याने उद्धवसेना आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता असून त्यांनी तशी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे कोणाला किती जागा आणि कोणता उमेदवार निवडणूक लढवणार या बाबी गुलदस्त्यात आहेत.
बैठका, घडामोडींकडे लक्ष
मीरा-भाईंदर पालिकेत भाजप-शिंदेसेनेत जागावाटपाचा तिढा कायम आहे. युतीबाबत २४ तासांत निर्णय घ्यावा असा अल्टिमेटमदेखील मंत्री सरनाईक यांनी रविवारी दिला आहे. त्यामुळे सोमवार, मंगळवार या दोन दिवसांत कोणकोणत्या बैठका, घडामोडी होतात याकडे लक्ष लागले आहे.
तयारीत राहण्याच्या सूचना
पक्षश्रेष्ठींनी उमेदवारांना तयारीत राहण्याच्या सूचना खासगीत दिलेल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात पक्षाचे एबी फॉर्मसह अर्ज उद्या शेवटच्या दिनी भरण्याची शक्यता आहे.