“बहुजन विकास आघाडीचा वसई-विरार निवडणुकीतही पराभव करू, आमचाच महापौर होईल”: स्नेहा दुबे पंडित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 14:08 IST2025-12-30T14:05:37+5:302025-12-30T14:08:33+5:30
VVCMC Election 2026: आतापर्यंत सुमारे डझनभर बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आणखी अनेकांशी चर्चा सुरू आहे, असे स्नेहा दुबे पंडित यांनी म्हटले आहे.

“बहुजन विकास आघाडीचा वसई-विरार निवडणुकीतही पराभव करू, आमचाच महापौर होईल”: स्नेहा दुबे पंडित
VVCMC Election 2026: राज्यातील २९ महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग येताना पाहायला मिळत आहे. वसई-विरार महानगरपालिकेतही जागावाटपावरून विरोधकांमध्ये बिनसल्याचे पाहायला मिळत असून, ठाकरे गटाने स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि मनसेने बहुजन विकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यातच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला पराभूत केल्यानंतर हीच लय कायम राखण्यासाठी भाजपाने तयारी सुरू केली आहे. तसेच वसई-विरार मनपात भाजपचा महापौर होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर आणि त्यांचा मुलगा क्षितिज ठाकूर यांना पराभव पत्करावा लागला होता. यानंतर आता वसई-विरार महापालिकेची सत्ता राखण्याचे आव्हान हितेंद्र ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीसमोर असणार आहे. यातच ठाकरे गटाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असला, तरी रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने बहुजन विकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिल्याचे म्हटले जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकूरांचे वर्चस्व खालसा करणाऱ्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी वसई विरार मनपा निवडणुकीतही भाजपा विजयी होईल, असे म्हटले आहे.
बहुजन विकास आघाडीचा वसई-विरार निवडणुकीतही पराभव करू
स्थापनेपासून बहुजन विकास आघाडीने वसई-विरार महानगरपालिकेवर नियंत्रण आहे. परंतु, यावेळी आम्ही त्यांना येथेही पराभूत करू. भाजपाचा महापौर होईल. केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपाचे सरकार आहे. वसई विरारमध्ये आमदारही आमचेच आहेत. त्यामुळे महापौर आमच्या पक्षाचे असतील, तर विकास योजना अधिक वेगाने पुढे जाऊ शकतील. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा पराभूत केल्यानंतर आता महापालिका निवडणुकीत भाजपा विजयी होईल, असे स्नेहा दुबे पंडित यांनी सांगितले.
दरम्यान, आतापर्यंत सुमारे डझनभर बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आणखी अनेकांशी चर्चा सुरू आहे. भाजपात आलेले नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते निवडणूक लढवण्याचा आग्रही नाहीत. मनपा निवडणुकांपूर्वी भाजपात प्रवेश केल्याने ते आनंदी आहेत, असा दावा स्नेहा दुबे पंडित यांनी केला आहे.