वसई विरार महापालिकेच्या कलांमध्ये भाजपासाठी धोक्याची घंटा; ठाकरेंना जमलं नाही ते ठाकूरांनी केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 11:25 IST2026-01-16T11:24:28+5:302026-01-16T11:25:04+5:30

वसई विरार महापालिकेत भाजपा आणि बहुजन विकास आघाडी यांच्यात थेट लढत होती. हिंतेंद्र ठाकूर यांच्या बविआकडे वसई विरारची सत्ता होती.

Vasai Virar Municipal Corporation result are a warning sign for BJP; Hitendra Thakur BVA did what Thackeray couldn't do | वसई विरार महापालिकेच्या कलांमध्ये भाजपासाठी धोक्याची घंटा; ठाकरेंना जमलं नाही ते ठाकूरांनी केले

वसई विरार महापालिकेच्या कलांमध्ये भाजपासाठी धोक्याची घंटा; ठाकरेंना जमलं नाही ते ठाकूरांनी केले

वसई - राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची मतमोजणी सकाळी १० वाजल्यापासून सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी निकालांचे कल येणे सुरू झाले आहे. राज्यात बहुतांश महापालिकेत भाजपा उमेदवार आघाडीवर आहेत परंतु वसई विरार महापालिकेत याउलट चित्र दिसत आहे. वसई विरार महापालिकेत ११५ जागांपैकी ८५ जागांवर बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराने आघाडी घेतली आहे. मागील ३५ वर्ष वसई विरारमध्ये बविआची सत्ता आहे. ही सत्ता बविआ कायम राखेल असा कौल निकालांमधून मिळत आहे.

वसई विरार महापालिकेत भाजपा आणि बहुजन विकास आघाडी यांच्यात थेट लढत होती. हिंतेंद्र ठाकूर यांच्या बविआकडे वसई विरारची सत्ता होती. याठिकाणी भाजपाने बविआला कडवी टक्कर दिली आहे. विधानसभा निवडणुकीवेळी याठिकाणच्या २ मतदारसंघात भाजपाचे आमदार निवडून आले होते. त्यामुळे या महापालिकेत भाजपा  काय कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते. वसई विरार महापालिकेत सत्ता आणण्यासाठी भाजपाने त्यांची ताकद पणाला लावली होती. परंतु निकालांच्या कलांमध्ये बविआने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.

एक्झिट पोलच्या अंदाजानुसारही बहुजन विकास आघाडीकडे सत्ता जाईल असा अंदाज वर्तवला होता. भाजपाला २७, शिंदेसेना ५, उद्धवसेना ७ आणि बहुजन विकास आघाडी ७२ जागा जिंकेल असा पोल आला होता. भाजपाला विधानसभेत जे यश मिळाले ते महापालिका निवडणुकीतही मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्ष निकालांच्या कलांमध्ये बहुजन विकास आघाडी पुढे असताना दिसते. वसई विरार महापालिकेत २९ प्रभागांतील ११५ जागांसाठी ५४७उमेदवार रिंगणात असून, यापैकी ३८६ उमेदवार हे विविध राजकीय पक्षांचे आहे, तर त्यांना टक्कर देण्यासाठी १५६ अपक्ष उमेदवारही सज्ज आहेत. या अपक्षांमध्ये उमेदवारी न मिळालेले काही राजकीय पक्षाचे बंडखोर उमेदवारही आहेत

Web Title: Vasai Virar Municipal Corporation result are a warning sign for BJP; Hitendra Thakur BVA did what Thackeray couldn't do