भाजपने निष्ठावंतांना डावलून चाळमाफियांना तिकीट विकले; वसईत रवींद्र चव्हाणांसमोरच संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 11:35 IST2026-01-02T11:35:24+5:302026-01-02T11:35:24+5:30
वसई-विरारमध्ये भाजपने अन्य पक्षातून आलेल्यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

भाजपने निष्ठावंतांना डावलून चाळमाफियांना तिकीट विकले; वसईत रवींद्र चव्हाणांसमोरच संताप
लोकमत न्यूज नेटवर्क, वसई-विरार : वसईतील नाराज भाजप कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यासाठी गुरुवारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आले होते. यावेळी एका कार्यकर्त्याने त्यांना अडवून खडे बोल सुनावले. भाजपने निष्ठावंतांना डावलून तिकीट विकले, चाळ माफिया, पक्षात नव्याने आलेल्या आयारामांना तिकीट दिले असा आरोप त्या कार्यकर्त्याने केल्याने खळबळ उडाली. पण पोलिसांनी म्हात्रे यांना बाजूला करून परिस्थिती शांत केली.
वसई-विरारमध्ये भाजपने अन्य पक्षातून आलेल्यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करून संवाद साधण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण गुरुवारी वसईत आले होते. त्यांनी माणिकपूर येथील वायएमसीए सभागृहात मार्गदर्शन केले. सभा संपवून चव्हाण बाहेर पडत असताना जुचंद्र येथील कार्यकर्ते निशिकांत म्हात्रे यांनी चव्हाण यांच्यासमोर संताप व्यक्त केला.
'१०७ पेक्षा अधिक नगरसेवक निवडून येणार'
वसई विरार मनपा निवडणुकीसाठी पक्षाच्या निवडणूक प्रमुख माजी खासदार पूनम महाजन यांनी यावेळी १०७ पेक्षा अधिक नगरसेवक निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. पक्षात अनेक कार्यकर्ते नाराज आहेत त्याबद्दल त्यांना विचारले असता, 'मी येथील जनतेशी मनाने कनेक्ट आहे. त्यामुळे लवकर सर्व ठीक होईल असे सांगितले. जनता प्रेम देते त्यामुळे नाराज कार्यकर्ते परत येतात. कोणी नाराज असेल तर त्यांची माफी मागते. कमी जास्त होत असते,' असेही त्या म्हणाल्या.