जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 12:25 IST2025-12-25T12:22:32+5:302025-12-25T12:25:39+5:30
Vasai Virar Mahapalika Election 2026: वसई-विरार महापालिकेत भाजपाला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. परंतु, ठाकूरांना शह देण्यासाठी भाजपाने रणनीती आखल्याचे म्हटले जात आहे.

जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Vasai Virar Mahapalika Election 2026: मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यावर आता पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकांमुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शह-काटशह, आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. यातच विधानसभेत ठाकूरांचा करेक्ट कार्यक्रम केल्यानंतर आता भाजपाने वसई-विरार महानगरपालिकेसाठी कंबर कसून तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला, त्याच ठिकाणाहून आता भाजपा ठाकूरांना खिंडीत गाठणार आहे.
वसई-विरार महापालिकेत भाजपला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. यासाठी महाविकास आघाडीने बहुजन विकास आघाडीला सोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे मनसेलाही महाविकास आघाडीत घेण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडीने स्वतंत्र निवडणुका लढविल्या होत्या. मतविभाजन होऊन दोन्ही पक्षांचा पराभव झाला आणि महायुतीने तीनही जागा जिंकल्या. त्यामुळे वसई विरार पालिकेत भाजपाला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत.
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार
वसई-विरार महापालिकेत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजपने 'विवांता' अस्त्र बाहेर काढले आहे. मागील वर्षी विवांता हॉटेलमध्ये बविआने केलेल्या राड्यात अनेक बविआ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता यातील निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांना तडीपार करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी विरारच्या विवांता हॉटेलमधील राडा संपूर्ण राज्यात चर्चेचा ठरला होता. आता महापालिका निवडणुकीपूर्वीच भाजपने 'विवांता' प्रकरण बाहेर काढले आहे. विवांता प्रकरणात गुन्हे दाखल असलेले बविआचे अनेक कार्यकर्ते निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्यावर मागील गुन्ह्यांचा आधार घेत तडीपार करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे कार्यकर्ते धास्तावले आहेत. ऐन निवडणुकीत उमेदवार तडीपार झाले तर बविआला मोठा फटका बसणार आहे.
दरम्यान, ज्याप्रमाणे अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीने भाजपला देशपातळीवर एक मोठी सांस्कृतिक आणि राजकीय ओळख मिळवून दिली, त्याच धर्तीवर वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीने उभारलेले 'द्वारकाधीश मंदिर' आगामी निवडणुकीत 'गेम चेंजर' करणार असल्याची चर्चा रंगत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, भाजपाने ज्या प्रकारे राम मंदिर हा श्रद्धेचा विषय विकासकामांशी जोडून मतदारांना आकर्षित केले, तोच पॅटर्न वसई-विरारमध्ये बविआ राबवताना दिसत आहे.