Lok Sabha Election 2019 Result: Rajendra Gavit's or Baliram Jadhav Who will win? | पालघर लोकसभा निवडणूक निकाल 2019: राजेंद्र गावित की बळीराम जाधव कोणाचा होणार विजय?
पालघर लोकसभा निवडणूक निकाल 2019: राजेंद्र गावित की बळीराम जाधव कोणाचा होणार विजय?

वसई-विरारः पालघर लोकसभा निवडणुकीकडेही निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. यंदा पालघर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून राजेंद्र गावित निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर त्यांच्याविरोधात हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांचं आव्हान आहे. बळीराम जाधव यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीनंही पाठिंबा जाहीर केला असल्यानं इथली लढत चुरशीही झाली आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, पालघर मतदारसंघात 20व्या फेरीनंतर राजेंद्र गावित यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना आतापर्यंत 150944 मतं मिळाली असून, बहुजन विकास आघाडीच्या  बळीराम जाधव यांच्या पारड्यात 136552 मतं पडली आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार चिंतामण वनगा इथून निवडून आले होते. त्यांनी बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांचे निधन झाल्यानंतर या रिक्त झालेल्या जागेवर 2018मध्ये पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत शिवसेनेनं चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली होती.

तर भाजपाकडून राजेंद्र गावित निवडणुकीच्या रिंगणात होते. त्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या राजेंद्र गावित यांना 2 लाख 72 हजार 782 मतं मिळाली होती, तर शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांना 2 लाख 43 हजार 838 मतं मिळाली होती. त्यानंतर शिवसेना आणि भाजपानं लोकसभा निवडणुकीत आघाडी केल्यानं तो मतदारसंघ शिवसेनेनं भाजपाकडून मागून घेतला आणि तिथून भाजपाचे खासदार राजेंद्र गावित यांना शिवसेनेच्या धनुष्यबाणावरून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. परंतु यंदा  पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीने बळीराम जाधव यांना काँग्रेस-राष्ट्रवादीनं पाठिंबा दिल्यानं त्यांची ताकद वाढली आहे. बळीराम जाधव हे 2009चे पालघरचे खासदार आहेत.


Web Title: Lok Sabha Election 2019 Result: Rajendra Gavit's or Baliram Jadhav Who will win?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.