वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 06:16 IST2025-07-30T06:16:21+5:302025-07-30T06:16:46+5:30

या छाप्यांबाबत ईडीने कमालीची गुप्तता पाळली आहे. एकाच वेळी १२ ठिकाणी छापेमारी करण्यात आली.

enforcement directorate took action against former vasai virar municipal commissioner and farewell ceremony on monday raid on tuesday | वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड

वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) वसई-विरार परिसरातील अनधिकृत बांधकामप्रकरणी मंगळवारी सकाळी सव्वासात वाजता वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या निवासस्थानासह १२ ठिकाणी छापे टाकले. विशेष म्हणजे पवार यांचा सोमवारी वसई-विरार पालिका मुख्यालयात निरोप समारंभात सत्कार करण्यात आला आणि दुसऱ्याच दिवशी त्यांच्या घरी ईडीची धाड पडली. 

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई, पुणे, नाशिक, वसई, विरार येथेही छापे टाकण्यात आले आहेत. बहुसंख्य छापे पवार यांच्याशी संबंधित ठिकाणांवर टाकण्यात आले. वसई-विरार परिसरात मलनिस्सारण आणि डम्पिंग ग्राऊंडसाठी राखीव असलेल्या ६० एकर भूखंडावर ४१ अनधिकृत इमारती उभारण्यात आल्या होत्या. याप्रकरणी यापूर्वीही ईडीने छापेमारी केली होती. याच प्रकरणात दोन महिन्यांत तिसऱ्यांदा छापेमारी करण्यात आली आहे.

महापालिकेचे नगर रचना अभियंते, वास्तुविशारद आणि विकासकांवर यापूर्वी धाडी टाकण्यात आल्या होत्या. हा घोटाळा उजेडात आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या इमारती पाडण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेवले होते. त्यानंतर फेब्रुवारीत या ४१ इमारती पाडण्यात आल्या होत्या. या इमारती पाडल्यामुळे रहिवासी बेघर झाले होते. 

कारवाईबद्दल कमालीची गुप्तता

अनिल कुमार पवार यांची ठाण्यात एसआरए विभागात बदली झाली आहे. त्यांचा सोमवारी पालिकेत निरोप समारंभ झाला आणि दुसऱ्याच दिवशी मंगळवारी त्यांच्यावर ही कारवाई झाली. या छाप्यांबाबत ईडीने कमालीची गुप्तता पाळली आहे. एकाच वेळी १२ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. त्यांच्याच इतर ठिकाणच्या निवासस्थानीही रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. 

 

Web Title: enforcement directorate took action against former vasai virar municipal commissioner and farewell ceremony on monday raid on tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.