मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 06:40 IST2026-01-01T06:39:50+5:302026-01-01T06:40:30+5:30
मीरारोडच्या प्रभाग १८ परिसरात भाजपाचे दौलत गजरे, विजय राय, नीला सोन्स व विविता नाईक हे चौघे नगरसेवक २०१७ साली निवडून आले होते.

मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल
मीरारोड - मीरारोडच्या प्रभाग १८ मधून भाजपचे नाराज उमेदवार दौलत गजरे यांनी प्रभागात अपक्षांचे पॅनल तयार करून निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. आमचे तिकीट भाजपाने कापले नसून आ. नरेंद्र मेहतांनी कापले आहे. मात्र आम्ही जुने भाजप कार्यकर्ते अन्याय आता सहन करणार नाही व लढणार असे गजरे यांनी सांगितले.
मीरारोडच्या प्रभाग १८ परिसरात भाजपाचे दौलत गजरे, विजय राय, नीला सोन्स व विविता नाईक हे चौघे नगरसेवक २०१७ साली निवडून आले होते. यंदा भाजपाने येथून केवळ नीला सोन्स यांना उमेदवारी दिली असून बाकी तिघांचे पत्ते कापून निर्मला सावळे, माजी नगरसेवक सचिन म्हात्रे यांची पत्नी मयुरी आणि विवेक उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे.
उमेदवारी न मिळाल्याने हे माजी नगरसेवक नाराज झाले आहेत. गजरे यांनी स्वतः अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्याच प्रभागातून उभे असलेल्या इम्रान हाशमी, रेणू मल्ला व वैशाली पाटील ह्या उमेदवारांना एकत्र घेऊन गजरे यांनी अपक्ष उमेदवारांचे पॅनल उभे केले आहे.
गजरे यांनी सांगितले कि, भाजपाचे चारही नगरसेवक असताना तिघांची उमेदवारी मेहतांनी कापून बाहेरच्या प्रभागातील उमेदवार लादून मनमानी केली आहे. प्रभागातील नागरिक आणि निष्ठावंत भाजपा कार्यकर्ते हे देखील नाराज असून ते आमच्या सोबत आहेत. विजय राय यांना तर एबी फॉर्म दिला आणि गाफील ठेवले. आणि नंतर दगाफटका व कारस्थान करून निवडणूक अधिकारी कडे पुन्हा पत्र देऊन त्यांचा एबी फॉर्म रद्द केला. असे विश्वासघातकी प्रकार भाजपाच्या संस्कृती मध्ये आपण पाहिले नाहीत असे दौलत गाजरे म्हणाले. आम्ही भाजपचे निष्ठावंत आहोत कोणाच्या कंपनीचे नाही. पंतप्रधान मोदींना नेतृत्व मानून प्रचार करणार असे गजरे यांनी म्हटले आहे.